Take a fresh look at your lifestyle.

आदिवासी शिक्षण व्यवस्थेला बळ : कनिष्ठ महाविद्यालय मुख्याध्यापकांची १४८ पदे तयार

0

आदिवासी विकास विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या सुधारित आकृतीबंधानुसार राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये मोठा प्रशासकीय बदल करण्यात आला आहे. शासनाने “माध्यमिक मुख्याध्यापक” या संवर्गातील पदांमधून १४८ “कनिष्ठ महाविद्यालय मुख्याध्यापक” गट-ब (राजपत्रित) पदांची निर्मिती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

202603131348341824

वरील लिंक ला क्लिक करा व सविस्तर GR वाचा 👆

सध्या “माध्यमिक मुख्याध्यापक” या संवर्गात एकूण ४५४ पदे मंजूर आहेत. मात्र, ज्या शासकीय आश्रमशाळांना कनिष्ठ महाविद्यालये संलग्न आहेत, अशा ठिकाणी माध्यमिक मुख्याध्यापक पदाऐवजी कनिष्ठ महाविद्यालय मुख्याध्यापक ही स्वतंत्र पदे निर्माण करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता माध्यमिक मुख्याध्यापक संवर्गातील पदांची संख्या ३०६ इतकी राहणार आहे.

या नव्या पदांसाठी एस-१८ वेतनश्रेणी (₹४९,१०० ते ₹१,५५,८००) निश्चित करण्यात आली आहे. तसेच शासकीय आश्रमशाळांमधील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांमधून ज्येष्ठता आणि पात्रता या निकषांनुसार पदोन्नतीने नियुक्ती करण्यात येणार आहे.

याशिवाय, ज्या आश्रमशाळा कनिष्ठ महाविद्यालयाशी संलग्न आहेत, त्या ठिकाणी कार्यरत असलेले माध्यमिक मुख्याध्यापक सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू किंवा बदलीमुळे पद रिक्त झाल्यास त्या ठिकाणी कनिष्ठ महाविद्यालय मुख्याध्यापकाची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

हा निर्णय उच्चस्तरीय सचिव समितीच्या ९ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या बैठकीतील मान्यतेनुसार तसेच वित्त विभागाच्या सहमतीने जारी करण्यात आला आहे. संबंधित शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याला २०२६०३१३१३४८३४१८२४ असा संकेतांक देण्यात आला आहे.

या निर्णयामुळे आदिवासी आश्रमशाळांतील शैक्षणिक व्यवस्थापन अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.