स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण : बार्टीकडून कडक नियम, पात्र विद्यार्थ्यांची तपासणी सुरू
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, अभियांत्रिकी सेवा, न्यायिक सेवा, अराजपत्रित गट “ब” व “क”, तसेच कर्मचारी निवड आयोग (SSC) वर्ग ३ परीक्षांसाठी देण्यात येणाऱ्या पूर्व प्रशिक्षणासाठी तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी १५ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.
वरील लिंक ला क्लिक करून सविस्तर GR वाचा 👆
निवड झालेल्या व कागदपत्रे तपासणी पूर्ण केलेल्या पात्र विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण २३ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, ऑनलाईन पोर्टलद्वारे प्रशिक्षण संस्था निवडलेल्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना रिक्त जागांनुसार ई-मेल व कन्फर्मेशन स्लिप १० मार्च २०२६ रोजी पाठविण्यात आल्या आहेत.
या विद्यार्थ्यांची कागदपत्र तपासणी १८ मार्च २०२६ या कालावधीत बार्टी, क्वीन्स गार्डन, पुणे येथे केली जात आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी १८ मार्चपर्यंत मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहणे आवश्यक असून, मुदतीत कागदपत्र तपासणी न केल्यास त्यांची निवड आपोआप रद्द करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाचा लाभ एका विद्यार्थ्याला जास्तीत जास्त दोन वेळाच मिळू शकतो. यापूर्वी दोन योजनांचा लाभ घेतलेल्या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येणार असून, UPSC (वर्ग-१) प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांना इतर प्रशिक्षण योजनांसाठी अपात्र ठरविण्यात येणार असल्याचेही बार्टीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
