महिलांच्या तक्रारींसाठी जिल्हाधिकारी दालन खुले; १६ मार्चला महिला लोकशाही दिन
महिलांच्या समस्या, तक्रारी व अडचणी ऐकून त्यावर तात्काळ तोडगा काढण्यासाठी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन येत्या सोमवार, १६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रफिक हुरमत रुबाब तडवी यांनी दिली आहे.
समस्याग्रस्त व पीडित महिलांना आपल्या अडचणी थेट प्रशासनापर्यंत मांडता याव्यात, त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे आणि त्यांना न्याय मिळावा या उद्देशाने महिला लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. या उपक्रमाद्वारे महिलांच्या तक्रारी व अडचणींची शासकीय यंत्रणेमार्फत दखल घेऊन त्यावर मार्गदर्शन व आवश्यक ती कार्यवाही केली जाते.
महिला लोकशाही दिन हा दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हा स्तरावर आयोजित केला जात असून समाजातील पीडित महिलांना आपले प्रश्न मांडण्यासाठी हे एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

तरी जिल्ह्यातील महिलांनी आपल्या समस्या, तक्रारी व अडचणी घेऊन १६ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.