Take a fresh look at your lifestyle.

MPSC स्पर्धकांना बळ: ‘अमृत’ योजनेतून मुख्य परीक्षा तयारीसाठी आर्थिक सहाय्य

संयुक्त नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२५ उत्तीर्ण उमेदवारांना मुख्य परीक्षा व मुलाखत तयारीसाठी आर्थिक मदत

0

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) संयुक्त नागरी सेवा पूर्व परीक्षा – २०२५ (राज्य सेवा) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) तर्फे प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. सन २०२५–२६ या कालावधीसाठी ही योजना राबविण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

या योजनेअंतर्गत राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांना मुख्य परीक्षा तसेच मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पटेल, राजपूत, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगूनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, हिंदू नेपाली, भूमिहार, लोहाणा, कानबी आदी समाज घटकांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

सन २०२५ मधील राज्य सेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेले आणि आर्थिक सहाय्याचा लाभ घेण्यास इच्छुक असलेले उमेदवार या योजनेसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर जाऊन “महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा” या शीर्षकाखाली उपलब्ध असलेला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावा.

अर्ज सादर करण्यापूर्वी संकेतस्थळावर दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. तसेच या योजनेविषयी भविष्यातील सर्व माहिती व सूचना केवळ अमृतच्या अधिकृत संकेतस्थळावरच प्रसिद्ध केल्या जाणार असून वृत्तपत्रांमध्ये स्वतंत्र जाहिरात दिली जाणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ६ एप्रिल २०२६ असून अधिक माहितीसाठी किंवा अर्ज भरताना काही अडचण असल्यास संबंधित जिल्हा अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी आर्थिक मदतीची संधी उपलब्ध झाल्याने MPSC स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही योजना मोठा आधार ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.