दुर्गम भागांना मिळणार तज्ज्ञ डॉक्टर; नियुक्तीत आदिवासी क्षेत्राला प्राधान्य
राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागांमध्ये आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महत्त्वाचा आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आरोग्य विभागात होणाऱ्या नवीन पदभरतीमध्ये तसेच सेवांतर्गत पदव्युत्तर (PG) पदवी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची प्रथम नियुक्ती आदिवासी भागात करण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे राज्यातील आदिवासी आणि दुर्गम भागांमध्ये दीर्घकाळापासून रिक्त असलेली डॉक्टरांची पदे प्राधान्याने भरली जाणार आहेत. त्यानंतरच बिगर आदिवासी भागातील पदांची नियुक्ती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यातील अनेक आदिवासी आणि दुर्गम भागांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्यामुळे नागरिकांना आरोग्य सेवा मिळण्यात अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने हा निर्णय घेतला असून, त्यामुळे त्या भागातील नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.
या निर्णयामुळे दुर्गम भागातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट होणार असून ग्रामीण आणि आदिवासी भागातील रुग्णांना उपचारासाठी शहरांकडे धाव घ्यावी लागणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.