ज्येष्ठांचा सन्मान, सुरक्षेची हमी; ‘१४५६७’ हेल्पलाईन देशभर सुरू
भारत सरकारने ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि सहाय्यासाठी ‘१४५६७’ हा राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांक सुरू केला असून, कोणताही STD कोड किंवा प्रीफिक्स न लावता हा क्रमांक थेट डायल करता येतो. देशातील प्रत्येक राज्यात ही सेवा कार्यरत असून दररोज सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत उपलब्ध आहे.
या हेल्पलाईनवर ज्येष्ठ नागरिकांना अडचणीच्या प्रसंगी तक्रार नोंदवता येते. तसेच वैद्यकीय मदत, छळापासून संरक्षण, जवळील लसीकरण केंद्रांची माहिती, सामाजिक व कायदेशीर मार्गदर्शन यांसारख्या विविध बाबींमध्ये तत्पर सहकार्य मिळते.
प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या नागरिकांनीही या सेवेबाबत समाधान व्यक्त केले असून, प्रतिसाद देणारे कर्मचारी संवेदनशील व सहकार्यशील असल्याचे नमूद केले आहे. गरजू ज्येष्ठ नागरिकांसाठी ही हेल्पलाईन आधारवड ठरत आहे.
