Take a fresh look at your lifestyle.

शासन निर्णय: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्याग्रह स्थळाला ५५ कोटींची गौरवांजली

0

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समतेच्या लढ्याला नवे वैभव प्राप्त करून देणारा ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाचा ९९ वा वर्धापन दिन यंदा शासन स्तरावर व्यापक स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. २० मार्च २०२६ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, याच दिवशी ५५ कोटी रुपयांच्या सुशोभीकरणाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे.

या प्रकल्पासाठी ५५ कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, वर्धापन दिन सोहळा व भूमिपूजन कार्यक्रमाचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले.

मंत्रालयात मंत्री शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले, विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदिप कांबळे, ‘बार्टी’चे महासंचालक सुनिल वारे, सहसचिव सोमनाथ बागुल, सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव, महाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, तहसीलदार महेश शितोळे तसेच संबंधित संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत वर्धापन दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

मंत्री शिरसाट म्हणाले, २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळे सत्याग्रह करून सामाजिक समतेचा ऐतिहासिक अध्याय रचला. त्या प्रेरणादायी घटनेच्या स्मरणार्थ यंदाचा वर्धापन दिन अधिक शिस्तबद्ध, भव्य आणि समाजप्रबोधनपर पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. सुशोभीकरणामुळे या ऐतिहासिक स्थळाला नवे वैभव प्राप्त होईल, त्यामुळे संबंधित यंत्रणांनी सर्व तयारी वेळेत आणि काटेकोरपणे पूर्ण करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

देशभरातून मोठ्या संख्येने अनुयायी महाड येथे दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन कार्यक्रमस्थळी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे, वाहतूक व सुरक्षा व्यवस्था सक्षम करणे, वैद्यकीय सेवा व स्वच्छतेची व्यवस्था करणे, तसेच मोठ्या एलईडी स्क्रीनद्वारे सुशोभीकरण प्रकल्पाची माहिती नागरिकांना दाखविण्याचे निर्देशही देण्यात आले.

बैठकीत जनसहभाग वाढविण्यासाठी विशेष उपक्रम, विद्यार्थी व युवकांचा सक्रिय सहभाग आणि विभागीय समन्वय यावर सविस्तर चर्चा झाली. ऐतिहासिक स्थळाच्या गौरवाला साजेसे आणि समता, न्याय व बंधुत्वाचा संदेश देणारे कार्यक्रम आयोजित करण्यावर भर देण्यात आला.

चवदार तळे सत्याग्रह हा सामाजिक न्याय, मानवी स्वाभिमान आणि समतेच्या लढ्याचा प्रेरणादायी अध्याय आहे. ९९ व्या वर्धापन दिनानिमित्त शासनाकडून समतेचा आणि बंधुत्वाचा संदेश अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.