Take a fresh look at your lifestyle.

भटक्या विमुक्त जमातींसाठी ‘वनार्टी’चा सर्वंकष रोडमॅप: शिक्षण-रोजगाराला नवी दिशा

0

विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील युवक-युवतींना शिक्षण व रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) यांचा सर्वंकष रोडमॅप तयार करण्यात येणार असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली. वनार्टीचा हा आराखडा शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली वनार्टीच्या संचालक मंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीस सहसचिव सुनील तुंबारे, वनार्टीचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे तसेच संचालक मंडळाचे सदस्य दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

बैठकीत महाज्योतीच्या धर्तीवर वनार्टीमार्फत २ हजार विद्यार्थ्यांना यूपीएससी, एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी पूर्व प्रशिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच शेती व उद्योग क्षेत्रात ३५० विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

संस्थेच्या कामकाजात पारदर्शकता व कार्यक्षमता वाढविण्यासाठी अंतर्गत लेखापरीक्षण धोरण, लेखांकन धोरण आणि कर्मचारी भरती आराखड्याला मंजुरी देण्यात आली. विविध विषयांतील कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांनाही संचालक मंडळाने हिरवा कंदील दिला. त्यामुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबत व्यावहारिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळणार आहे.

याशिवाय चालू आर्थिक वर्ष व २०२६-२७ या वर्षासाठी निधी प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय स्तरावरील संस्थांशी करार करून गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देण्यासही मान्यता देण्यात आली.

 

वनार्टीच्या या नव्या उपक्रमांमुळे विमुक्त जाती व भटक्या जमातीतील युवक-युवतींना शिक्षण, कौशल्य आणि रोजगाराच्या संधींचा नवा मार्ग खुला होणार असल्याचे मत मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केले.