ST प्रवासात डिजिटल क्रांती! सवलतधारकांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासात आता तंत्रज्ञानाची नवी क्रांती सुरू झाली आहे. रोख व्यवहारांपासून पुढे जात पारदर्शक, सुरक्षित आणि सुलभ सेवा देण्यासाठी एसटी महामंडळाने ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
मंत्री सरनाईक म्हणाले, ही केवळ तांत्रिक सुधारणा नसून प्रवाशांच्या विश्वासाला डिजिटल बळ देणारे महत्त्वाचे पाऊल आहे. सवलतींची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोखविरहित व्यवहार या सर्व सुविधा आता एका स्मार्ट कार्डमध्ये उपलब्ध होणार आहेत. विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी पुढे हे कार्ड अनिवार्य असणार आहे.
या प्रकल्पासाठी एसटी महामंडळाने मे. ईबिक्स टेक्नोलॉजिस लि. आणि NSDL पेमेंट्स बँक यांच्याशी करार केला असून, लवकरच सर्व आगारांमध्ये नोंदणी मोहीम सुरू होणार आहे.
🔹 कोणाला मिळणार NCMC कार्ड?
विद्यार्थी : शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘सरल’ क्रमांकाशी जोडलेले कार्ड.
ज्येष्ठ नागरिक व महिला : अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड.
दिव्यांग प्रवासी : UDID क्रमांकाशी जोडलेले विशेष सुविधा असलेले कार्ड.
पुरस्कारार्थी व पत्रकार : स्वातंत्र्यसैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार व राज्यस्तरीय पुरस्कार विजेते यांना विभागीय कार्यालयामार्फत वितरण.

🔹 कार्डची वैशिष्ट्ये
किंमत : नवीन कार्ड १९९ रुपये (GST सह); जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास १४९ रुपये.
वॉलेट मर्यादा : किमान १०० रुपये; ५० रुपयांच्या पटीत रिचार्ज.
रिचार्ज सुविधा : ईटीआयएम मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप किंवा नियुक्त एजंटमार्फत.
व्यापक नोंदणी यंत्रणा : ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी ३००० हून अधिक अधिकृत एजंट.
ग्रामीण भागाला दिलासा : बसस्थानकांवरच नोंदणीची सुविधा.
एसटीचा हा निर्णय म्हणजे पारंपरिक प्रवास व्यवस्थेला डिजिटल स्पर्श देणारा ऐतिहासिक टप्पा ठरत आहे. तिकीट आणि सुट्ट्या पैशांची चिंता आता मागे पडणार असून, एका स्मार्ट कार्डच्या स्पर्शाने प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक होणार असल्याचा विश्वास मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.