आरटीओत पसंतीचा नंबर आरक्षित करण्याची संधी!
प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) येथे चारचाकी खासगी वाहनांसाठी ‘MH 03 FD’ ही नवीन नोंदणी मालिका ११ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू करण्यात येणार आहे. दुचाकींसाठीची ‘MH 03 EX’ मालिका संपत आल्याने नव्या मालिकेची अंमलबजावणी करण्यात येत असल्याची माहिती आरटीओ प्रशासनाने दिली.
या मालिकेत आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक मिळवू इच्छिणाऱ्या वाहनधारकांनी विहित नमुन्यातील अर्ज, पत्त्याचा पुरावा, फोटो ओळखपत्र, पॅन कार्ड तसेच आवश्यक शुल्कासह (राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष – Regional Transport Office Mumbai East यांच्या नावे) ११ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत अर्ज सादर करावा.
एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास, ८ मे २०१६ च्या शासन अधिसूचनेनुसार नियमित शुल्काव्यतिरिक्त सर्वाधिक रकमेचा धनाकर्ष सादर करणाऱ्या अर्जदारास संबंधित क्रमांक देण्यात येणार आहे.
आकर्षक क्रमांकांच्या कार्यपद्धतीची माहिती कार्यालयाच्या सूचनाफलकावर उपलब्ध आहे. अनधिकृत व्यक्तींमार्फत फसवणूक टाळण्यासाठी वाहनधारकांनी स्वतः कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी पल्लवी कोठावदे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी https://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, rto.03-mh@gov.in या ई-मेलवर संपर्क साधावा किंवा ०२२-२४०३६२२१ या दूरध्वनी क्रमांकावर माहिती घ्यावी.