नवजात बालकांसाठी शासनाची बेबी केअर किट योजना…
राज्यात शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र / शासकीय रुग्णालयात गरोदरपणाची नाव नोंदणी केलेल्या व त्याठिकाणी प्रसुती होणा-या महिलांना पहिल्या प्रसुतीच्या वेळी त्यांच्या नवजात बालकांसाठी (मुलगा किंवा मुलगी)शासनातर्फे रुपये २०००/- (रुपये दोन हजार फक्त) इतक्या रकमेचे बेबी केअर किट उपलब्ध करून देण्यास संदर्भाधीन क्र. १ येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. तसेच नाव नोंदणी शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र / शासकीय रुग्णालयात करण्यात आलेली आहे. परंतु, अपवादात्मक परिस्थितीत खाजगी रुग्णालयात काही कारणास्तव प्रसुतीसाठी दाखल केलेले लाभार्थी या योजनेस पात्र राहतील अशी देखील तरतूद सदर शासन निर्णयान्वये करण्यात आलेली आहे. सदर योजनेच्या अटी शर्तीमध्ये बदल करण्यासंदर्भात आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांनी संदर्भाधीन क्रमांक २ येथील दिनांक ०७.०६.२०२५ रोजीच्या पत्रान्वये सादर केलेल्या प्रस्तावास अनुसरून सदर योजनेच्या अटी शर्तींमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.
