Take a fresh look at your lifestyle.

व्हॅकेशन होम, पर्यटन अपार्टमेंट, पर्यटन व्हिला व होमस्टेची नोंदणी करा; पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांना आवाहन

0

जळगाव– महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाकडून राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पर्यटकांना सुरक्षित, अधिकृत आणि दर्जेदार निवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व्हॅकेशन होम, पर्यटन अपार्टमेंट, पर्यटन व्हिला आणि होमस्टे यांसारख्या निवास प्रकारांची अधिकृत नोंदणी पर्यटन संचालनालयामार्फत करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

या उपक्रमातून पर्यटकांना स्थानिक जीवनशैली, संस्कृती, खाद्यसंस्कृती आणि पाहुणचाराचा अनुभव घेता येईल. तसेच, नोंदणीकृत निवासस्थळांना ‘पर्यटन मान्यता प्रमाणपत्र’ देण्यात येते, ज्यामुळे पर्यटकांचा विश्वास वाढतो व सुरक्षा, स्वच्छता आणि गुणवत्ता यासाठी शासनाने ठरवलेल्या मानकांचे पालन सुनिश्चित होते, ज्यामुळे पर्यटन क्षेत्रातील गुणवत्ता वाढते. या नोंदणी केल्यामुळे पर्यटन संचालनालयाच्या अधिकृत वेबसाईट्स आणि प्रचार माध्यमांवर प्रसिद्धी मिळते. शासनाच्या पर्यटनविषयक विविध योजना, प्रशिक्षण कार्यक्रम, सबसिडी, आणि प्रोत्साहनपर उपक्रमांचा लाभ घेता येतो.

या उपक्रमासाठी प्रधान सचिव आणि पर्यटन संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन संचालनालयाचे प्रादेशिक उपसंचालक विजय जाधव हे प्रयत्नशील असून इच्छुक व्यावसायिकांनी अधिक माहितीसाठी पर्यटन संचालनालय, नाशिक – पर्यटन भवन, शासकीय विश्रामगृह आवार, गोल्फ क्लब मैदानाजवळ, नाशिक (४२२००१) येथे संपर्क साधावा. दूरध्वनी क्रमांक (०२५३) २९९५४६४ / ८३९०७३१७३७, ई-मेल ddtourism.nashik-mh@gov.in, तसेच अधिक माहितीसाठी www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी. पर्यटन व्यवसायाशी संबंधित सर्व मालक, ऑपरेटर व स्थानिक नागरिकांनी आपल्या निवास सुविधांची नोंदणी पर्यटन संचालनालयाच्या प्रादेशिक कार्यालयात करावी, असे आवाहन पर्यटन संचालनालयातर्फे करण्यात आले आहे.