डिजिटल पेमेंटमध्ये मोठी क्रांती; आता यूपीआयने पेमेंटवर मिळेल ईएमआयचा पर्याय…
भारतातील डिजिटल पेमेंट प्रणालीमध्ये लवकरच एक मोठा बदल होणार असून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आता UPI वर ईएमआय म्हणजेच हप्त्यांमध्ये पैसे देण्याचा पर्याय आणला आहे. या नव्या सुविधेमुळे आता ज्या ग्राहकांकडे क्रेडिट कार्ड नाही तेसुद्धा मोठी खरेदी करताना हफ्त्यांमध्ये पेमेंट करू शकतील.
यामुळे यूपीआय केवळ पेमेंटचा पर्याय न राहता एक संपूर्ण क्रेडिट प्रणाली बनण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. एनपीसीआयच्या माहितीनुसार आता ग्राहक जेव्हा क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करतील तेव्हा त्यांना थेट ईएमआयमध्ये पेमेंट करण्याचा पर्याय उपलब्ध होईल. सध्या या सुविधेवर क्रेडिट कार्ड पेमेंट्सवर सुमारे 1.5% इंटरचेंज फीस आकारली जाईल.
यामुळे फिनटेक कंपन्या जसे की Paytm आणि Navi साठी नवीन कमाईचा मार्ग मोकळा होईल. या कंपन्या आधीपासूनच बँकांसोबत मिळून ग्राहकांना Buy-Now-Pay-Later सारखे पर्याय देत आहेत आणि या नव्या सुविधेमुळे त्यांचा व्यवसाय आणखी मजबूत होईल. या बदलामुळे यूपीआयवर छोटी कर्जे आणि Buy-Now-Pay-Later मॉडेल्स अधिक लोकप्रिय होतील असा तज्ञांचा अंदाज आहे.

मात्र बँकांनी यावर सावध भूमिका घेण्याची तयारी केली आहे. लहान कर्जांमध्ये बॅड लोनचा धोका असतो. तरीही यूपीआयचे सध्या दरमहा जवळपास 20 अब्ज (20 Billion) व्यवहार होतात आणि त्याचे 25 ते 30 कोटी ग्राहक आहेत. त्यामुळे ईएमआयचा पर्याय या मोठ्या नेटवर्कची ताकद कित्येक पटीने वाढवू शकतो.