Take a fresh look at your lifestyle.

जात वैधता प्रमाणपत्र प्रलंबित प्रकरणांच्या पडताळणीसाठी राज्यात विशेष मोहीम

0

मुंबई- ‘बार्टी’ मार्फत सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना १ ते २८ फेब्रुवारी दरम्यान प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याच्या व ज्या प्रकरणांत त्रुटी आहेत त्याची पूर्तता करण्याबाबत विशेष मोहिम राबवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सन २०२१-२२ या वर्षात शैक्षणिक, सेवा, निवडणुक, इतर कारणांकरिता जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे.ज्या अर्जदारांची प्रकरणे त्रुटीअभावी संबंधित समितीकडे प्रलंबीत आहेत. अशा विद्यार्थ्यांचे व अर्जदारांचे नुकसान होवू नये म्हणून शासनाच्या निर्देशान्वये ‘बार्टी’ कार्यालयाने सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना दि. ०१ ते दि. २८ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत विशेष मोहीम राबविण्याबाबत कळविले आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत समितीकडील सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याच्या व ज्या प्रकरणांत त्रुटी आहेत, त्याबाबत संबंधित विद्यार्थ्यास व अर्जदारास त्यांच्या प्रकरणांतील त्रुटी पूर्तता करून घेण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.

ज्या विद्यार्थ्यांना व अर्जदारांनी जात वैधता प्रमाणपत्र त्रुटीअभावी प्राप्त केलेले नाही, त्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी त्रुटी पूर्तता करण्यासाठी आवश्यक पुरावे व मूळ कागदपत्रांस दि.२८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत संबंधित समितीकडे संपर्क साधावा, असे आवाहन बार्टीचे महासंचालक तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मुख्य समन्वयक धम्मज्योती गजभिये यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.