ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्यात मोठे बदल; जाणून घ्या नवीन ‘भैरव रेजिमेंट’ बाबत…
भारतीय लष्करात मोठा संघटनात्मक बदल होणार असून प्रत्येक बटालियन पातळीवर ड्रोन आणि काऊंटर-ड्रोन प्रणाली ही मानक शस्त्र प्रणाली म्हणून समाविष्ट केली जाणार आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर लष्कराची ही मोठी वाटचाल सुरु झाली आहे. या बदलांमध्ये लाइट कमांडो बटालियन, रुद्र ब्रिगेड, ड्रोन युनिट्स आणि स्पेशल आर्टिलरी बॅटर्या यांचा समावेश आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून या योजनांवर चर्चा सुरू होती मात्र मे महिन्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर या प्रक्रियेला वेग आला आहे. या बदलांपैकी काही बदल या ऑपरेशनमधून मिळालेल्या अनुभवांवर आधारित असतील. या बदलांमुळे लष्कर भविष्यातील पारंपरिक व हायब्रिड युद्धांसाठी अधिक सक्षम होणार आहे.
या बदलांमधील एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे रेजिमेंटमध्ये ड्रोन्स आणि ड्रोनविरोधी प्रणालींचा समावेश करणे. आता प्रत्येक युनिटमध्ये एक तुकडी तयार करण्यात येणार असून या तुकडीचे मुख्य काम हे फक्त ड्रोन चालवणे असेल. भारतीय लष्करातील प्रत्येक विभागाला याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी विविध विभागांमधून सुमारे ७० सैनिकांची नव्याने नियुक्ती करावी लागेल आणि काहींच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल करावा लागेल.
भारतीय लष्कर भैरव नावाने 30 कमांडो बटालियन तयार करत आहे. प्रत्येक बटालियनमध्ये सुमारे 250 सैनिक असतील. याशिवाय लष्कर रुद्र ब्रिगेडची स्थापना करणार आहे, ज्यात सर्व शस्त्रप्रणालींनी युक्त ब्रिगेडसह ड्रोन्स आणि इतर लॉजिस्टिक घटक असतील. यासाठी सध्याच्या पायदळ, चिलखती आणि तोफखाना ब्रिगेडची पुनर्रचना केली जाईल. यामुळे रुद्र ब्रिगेड भविष्यातील युद्धांसाठी एकात्मिक युनिट म्हणून विविध क्षेत्रांमध्ये स्वतंत्रपणे काम करू शकतील.