आता नियमित शिक्षकांची नियुक्ती! कंत्राटी शिक्षक नियुक्ती रद्द: पवित्र पोर्टलद्वारे रिक्त जागा भरणार !
१० किंवा १० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांमधील सर्व रिक्त जागा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नियुक्त होणाऱ्या शिक्षकांतून भरण्याचे आदेश १० फेब्रुवारी २०१४च्या शासन निर्णयानुसार दिले आहेत. शासनाने शाळेत कंत्राटी शिक्षक नियुक्तीचा आदेश रद्द केला असून, या निर्णयाचे शिक्षक संघटनांनी स्वागत केले आहे.
राज्य शासनाने यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १० व १०पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डी.एड, बी. एड अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती देण्यास मान्यता दिली होती. याला राज्यातील शिक्षक संघटनांनी विरोध केला करीत, आंदोलन, उपोषण करीत हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली होती. त्यामुळे शासनाने कंत्राटी शिक्षक नियुक्तीचा आदेश रद्द करीत पटसंख्या कमी असणाऱ्या शाळांमध्ये आता पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांच्या जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे.
पात्र शिक्षक उपलब्ध होणार ! – सन २०२२च्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणांच्या आधारे करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा दि. २० जानेवारी २०२५ रोजी प्रत्यक्षात सुरू झाला आहे. त्यामुळे आवश्यक अर्हताधारक व पात्र शिक्षक नियमित तत्त्वावर उपलब्ध होणार आहेत. या शिक्षकांमधूनच या रिक्त जागा भरण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे ज्या उमेदवारांना त्या शासन निर्णयातील तरतुदींच्या आधारे कंत्राटी तत्त्वावर तात्पुरती नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचा कार्यकाळ संपुष्टात आल्यावर त्यांना पुनर्नियुक्ती देता येणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक नियुक्तीचे आदेश होते. परंतु आता शासनाने हा निर्णय रद्द करीत, या शाळांमध्ये पवित्र पोर्टल अंतर्गत शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याचे निर्देश दिले आहेत. जागा उपलब्धतेनुसार शिक्षकांना नियुक्ती दिली जाणार आहे. रतनसिंग पवार, शिक्षणाधिकारी, प्राथमिक