Take a fresh look at your lifestyle.

विद्यार्थ्यांनो, कॉपीमुक्त परीक्षांच्या पार्श्वभूमीवर शासनाचा ‘ह्या’ योजना…

0

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारावी व दहावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर सर्व संबंधितांची बैठक घेऊन कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेण्याचे निर्देश दिले. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे तसेच मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी देखील या अनुषंगाने बैठक घेऊन निर्देश दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

राज्य मंडळामार्फत देण्यात आलेल्या माहितीनुसार ज्या परीक्षा केंद्रावर गैरमार्गांची प्रकरणे आढळून आली आहेत, अशा परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती केंद्रावर समाविष्ट असणाऱ्या शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर अन्य शाळा / उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांमधून करण्यात येत आहे.

फेब्रुवारी-मार्च 2025 च्या परीक्षांमध्ये ज्या परीक्षा केंद्रावर गैरमार्गाची प्रकरणे आढळून येतील त्या केंद्रांची परीक्षा केंद्र मान्यता पुढील वर्षीपासून कायमची रद्द करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष यांना त्यांच्या जिल्ह्यात परीक्षा पारदर्शकपणे होण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे नियोजन करण्याची मुभा देण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी परीक्षा कालावधीत प्रत्येक परीक्षा केंद्रावर पूर्ण वेळ बैठे पथक कार्यरत राहील अशी कार्यवाही करण्याबाबत सर्व विभागीय मंडळे व सर्व संबंधितांना कळविण्यात आले आहे.

जनजागृती उपक्रम- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार 100 दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत 20 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 या कालावधीत कॉपीमुक्त अभियानांतर्गत जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला. यामध्ये लोकप्रतिनिधी, शाळा व्यवस्थापन, नागरिक, शिक्षक, मुख्याध्यापक यांची संयुक्त सभा घेऊन अभियानाची अंमलबजावणी करण्याबाबत माहिती देणे, सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये कॉपीमुक्तीची शपथ, शिक्षासूचीचे वाचन, गैरमार्ग केल्यास होणाऱ्या परिणामांची जाणीव, तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्याबाबत तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन, जनजागृती फेरी, ग्रामसभा बैठकीमध्ये जनजागृती आणि कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी ग्रामस्थांना आवाहन आदी उपक्रम राबविण्यात आले.

बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या- इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी 10 हजार 550 कनिष्ठ महाविद्यालयांमधून 15 लाख 05 हजार 037 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून यामध्ये 8 लाख 68 हजार 967 मुले, 6 लाख 94 हजार 652 मुली व 37 ट्रान्सजेंडर आहेत. तर, विज्ञान शाखेमध्ये 7 लाख 68 हजार 967, कला शाखेमध्ये 3 लाख 80 हजार 410, वाणिज्य शाखेमध्ये 3 लाख 19 हजार 439, किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमामध्ये 31 हजार 735 तर टेक्निकल सायन्स शाखेमध्ये नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 4 हजार 486 इतकी आहे. एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी दिनांक 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत आवेदनपत्रे स्वीकारण्यात आलेली आहेत.

विभागनिहाय परीक्षा केंद्रांची संख्या- इयत्ता बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत 3,373 परीक्षा केंद्रावर होणार आहे. तर, दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत 5,130 परीक्षा केंद्रावर होणार आहे. यामध्ये पुणे विभागीय मंडळात इयत्ता बारावीसाठी 432 तर दहावीसाठी 659 केंद्र, नागपूर विभागात बारावीसाठी 504 तर दहावीसाठी 679 केंद्र, छत्रपती संभाजीनगर विभागात बारावीसाठी 460 तर दहावीसाठी 646 केंद्र, मुंबई विभागात बारावीसाठी 670 तर दहावीसाठी 1 हजार 055 केंद्र, कोल्हापूर विभागात बारावीसाठी 176 तर दहावीसाठी 357 केंद्र, अमरावती विभागात बारावीसाठी 541 तर दहावीसाठी 721 केंद्र, नाशिक विभागात बारावीसाठी 280 तर दहावीसाठी 486 केंद्र, लातूर विभागात बारावीसाठी 249 तर दहावीसाठी 413 केंद्र आणि कोकण विभागात बारावीसाठी 61 तर दहावीसाठी एकूण 114 केंद्र असणार आहेत.