‘DBT पोर्टल’मध्ये दुरुस्ती; आता करा अर्ज ! कृषी क्रांती, कृषी स्वावलंबन योजना: लाभार्थ्यांना दिलासा
कृषी विभागाच्या महा डीबीटी पोर्टलमध्ये आवश्यक दुरुस्ती झाल्याने वाढीव अनुदानित विहिरी व अन्य घटकांसाठी शेतकऱ्यांना अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, तर अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबविण्यात येते.
रोजगार हमी योजनेतील सिंचन विहिरींसाठी अनुदान चार लाख रुपये करण्यात आले. त्यानंतर कृषी क्रांती आणि कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत विहिरींचे अनुदानही अडीच लाखांवरून चार लाख रुपये करण्याची मागणी राज्यभरातील शेतकऱ्यांकडून होत होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाने या दोन्ही योजनांतील अनुदान चार लाख रुपये करण्यास मान्यता दिली, तसेच वार्षिक उत्पन्नाची अटही रद्द केली. मात्र, महा डीबीटी पोर्टलमध्ये सुधारणा नसल्याने दीड लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या शेतकऱ्यांना अर्ज करता येत नव्हता. आता या तांत्रिक अडचणी दूर झाल्याने सिंचन विहिरी व इतर घटकांसाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
४ लाख रुपयांचे अनुदान मिळणार – कृषी क्रांती व कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत यापूर्वी सिंचन विहिरीसाठी अडीच लाख रुपये अनुदान होते. ते वाढवून चार लाख रुपये करण्यात आले आहे. महाडीबीटी पोर्टलमध्ये सुधारणा झाल्याने पात्र शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झाल्यानंतर त्यांना वाढीव अनुदान मिळणार आहे.
संकेतस्थळ दुरुस्तीबाबत पाठपुरावा – महा डीबीटी संकेतस्थळात वार्षिक उत्पन्नाच्या अटीबाबत दुरुस्ती झाली नसल्याने शेतकऱ्यांना अर्ज करण्यापासून वंचित राहावे लागत होते. ही बाब वाशिम जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी गणेश गिरी यांनी पुणे येथील महा डीबीटी संकेतस्थळाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिली होती. आता संकेतस्थळात दुरुस्ती झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
जुन्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी अनुदान वाढ – यापूर्वी जुन्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी ५०,००० रुपये अनुदान देण्यात येत होते. आता हे अनुदान दुपटीने वाढवून एक लाख रुपये करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांना जुन्या विहिरींच्या दुरुस्तीसाठीही मोठा लाभ मिळणार आहे.