नागरिकांनो, आता सर्व शासकीय सेवा घरबसल्या मिळणार; शासनाचा मोठा निर्णय…
राज्यातील नागरिकांना घरबसल्या शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यभरातील नागरिकांना शासकीय सेवा जास्तीत जास्त मोबाईलच्या माध्यमातून सहजपणे मिळाव्यात यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.
सर्व सेवा ऑनलाईन करण्याचा निर्णय
राज्यातील विविध विभागांच्या एकूण 996 शासकीय सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. या सेवांमध्ये पुढील प्रकारांचा समावेश आहे.
आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध सेवा—536
संबंधित विभागांच्या पोर्टलवर उपलब्ध सेवा—90
सध्या ऑफलाईन सेवा—343
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व ऑफलाईन सेवा लवकरात लवकर आपले सरकार पोर्टल वर उपलब्ध करण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांना 99 टक्के शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध व्हाव्यात, यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाला 100 दिवसांत काम पूर्ण करण्याचा निर्देश देण्यात आला आहे.
सेवा अधिसूचना आणि सुधारणा
ज्या सेवांची अद्याप अधिसूचना झालेली नाही, त्या तत्काळ अधिसूचित करण्यासाठी संबंधित मंत्री आणि सचिवांनी पुढाकार घ्यावा. तसेच, नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार जावे लागू नये, यासाठी विशेष लक्ष दिले जाईल.