अनुसूचित जमातींच्या मुला/मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची मोठी संधी
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळावी आणि त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा यासाठी आदिवासी विकास विभागाकडून राज्यातील विद्यार्थ्यांना परदेशात पदवी/पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणेसाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. अनुसूचित जमातीचे जे विद्यार्थी पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी, पीएचडी अभ्यासक्रमास क्यूएक्स वर्ल्ड रॅकींग 200 च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतील अशा 40 विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती मंजूर केली जाते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठीचे विद्यार्थी अनुसूचित जमातींचा, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. विद्यार्थ्यांकडे जमातींचे वैधता प्रमाणपत्र असावे.परदेशातील क्यूएक्स वर्ल्ड रॅकींग 200 च्या आत असलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये विद्यार्थ्याला प्रवेश
मिळालेला असावा, विद्यार्थ्यांने पदव्युत्तर अभ्यासक्रम किंवा पीएचडी अभ्यासक्रमासाठी अर्ज करताना या पूर्वी इतर कोणत्याही राज्य शासनाची किवा केंद्र शासनाची परदेशी शिष्यवृत्ती घेतलेली नसावी, परदेशातील विद्यापीठ शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेणारा विद्यार्थी हा पूर्णवेळ विद्यार्थी म्हणून प्रवेशित असावा, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी लाभार्थ्यांची वयाची कमाल मर्यादा 35 वर्ष आणि पीएचडी अभ्यासक्रमासाठी लाभार्थ्यांची वयाची कमाल मर्यादा 40 वर्ष असावी. विद्यार्थ्यांच्या पालकांचे कुटुंबाचे किंवा विद्यार्थी नोकरी करीत असल्यास त्यांच्या स्वतःचे उत्पन्न धरुन सर्व मार्गानी मिळणारे वार्षिक उत्पन्न रु.8.00 लाखापेक्षा जास्त नसावे.विद्यार्थी किंवा पालक किंवा दोन्ही नोकरीत असतील तर त्यांचे आयकर विवरणपत्र, फॉर्म नं. 16 व सक्षम प्राधिकारी (तहसिलदार किंवा नायब तहसिलदार पेक्षा कमी दर्जा नसलेल्या) यांच्याकडील मागील आर्थिक वर्षाचे कुटुंबाचे सर्व मार्गानी मिळणा-या उत्पनाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. इतर विद्यार्थ्यांसाठी सक्षम प्राधिकारी (तहसिलदार किंवा नायब तहसिलदार पेक्षा कमी दर्जा नसलेल्या) यांच्याकडील मागील आर्थिक वर्षांचे कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.पीएचडी अभ्यासक्रमासाठी 4 वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा कमी असेल ते, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी 3 वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यसाक्रमाचा कालावधी यापेक्षा कमी असेल ते, पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी 2 वर्ष किवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा कमी असेल ते, एक्झ्युक्युटीव्ह पदव्युत्तर पदवी किवा पदव्युत्तर पदविका व अर्धवेळ अभ्यासक्रमास प्रवेशित असणारा विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असणार नाही.
तसेच योजनेचा लाभ एका विद्यार्थ्यांस फक्त एकदा घेता येईल. एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त अपत्यांना ही शिष्यवृत्ती लागू राहणार नाही. यासाठी पालकांनी/विद्याथ्यांनी तसे हमीपत्र करुन देणे बंधनकारक असेल.ही योजना या शासननिर्णयातील नियमावली, अटी व शर्तीनुसार राबविण्यसाठी शासन प्राधिकृत करेल त्या यंत्रणेकडून अथवा आयुक्त, आदिवासी विकास नाशिक यांचेमार्फत राबविण्यात येईल. परदेशी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन प्रणाली विकसीत झाल्यानंतर अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील. ऑनलाईन अर्ज भरण्याचे संकेतस्थळ वर्षभर खुले असेल.
उमेदवारांनी संपूर्णपणे भरलेला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईनअर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील.सक्षम अधिकारी यांनी दिलेला जमातीचा दाखला आणि जमातींचे वैधता प्रमाणपत्र, विहीत नमुन्यातील अर्ज, सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेला उत्पन्नचा दाखला, पदवी/पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण झाल्याचे पुरावे (सनद, मार्कलिस्ट), परदेशातील Qs World Ranking 200 पेक्षा कमी असलेल्या शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश मिळाल्याबाबतचे विनाअट ऑफर लेटर, ज्या विद्यापीठामध्ये प्रवेश मिळाला आहे त्याचे सविस्तर माहिती पत्रिकेची प्रत, आवश्यक ते करारनामे/हमीपत्रे. शैक्षणिक पार्श्वभूमी आणि पदवीधर अभ्यासक्रमासाठी सज्जता दर्शवणारी दोन राजपत्रित अधिकाऱ्यांचे शिफारस पत्र अथवा विद्यार्थ्यांने शिक्षण घेतलेल्या संस्थेतील दोन प्राध्यापकांची शिफारस पत्रे.संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण होण्यासाठी वर्षनिहाय आवश्यक असणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक, ज्यामध्ये शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क, इतर शुल्क पाठ्यपुस्तके, स्टेशनरी, भोजन व राहण्याचा खर्च, येण्या-जाण्याचा विमानाचा प्रवास यांचा समावेश असावा.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी प्रकल्प कार्यालय, यावल येथे संपर्क साधण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यावल यांनी केले आहे.