शिक्षण मंडळातर्फे दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध…
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा 11 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत घेतली जाणार असून, दरवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे आठ ते दहा दिवस परीक्षा लवकर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्य मंडळाचे सचिव देविदास कुल्हाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे अंतिम वेळापत्रकाबाबतची माहिती दिली असून राज्य मंडळाच्या वेळापत्रकानुसार बारावीची प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन, तोंडी परीक्षा 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत, तर दहावीची प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन, तोंडी परीक्षा 3 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.
दरम्यान, परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांची खात्री करून परीक्षा द्यावी. अन्य संकेतस्थळांवरील किंवा यंत्रणेने छपाई केलेले, व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून प्रसिद्ध झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.