Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ मध्ये कृषिसेवेतील पदांचा समावेश करण्याबाबत प्रसिद्धी पत्रक जारी….

0

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ करीता दिनांक २९ डिसेंबर, २०२३ रोजी विविध संवर्गांच्या एकूण २७४ रिक्त पदांकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण अधिनियम, २०२४ अनुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षित पदसंख्या नमूद करून एकूण ५२४ पदांचे शुद्धिपत्रक दिनांक ८ मे, २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. सदर जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर शासनाच्या कृषि, पशुसवंर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे क्र. कृषिआ १०२३/प्र.क्र.२१९ / १६- ए. दिनांक १६ ऑगस्ट, २०२४ रोजीच्या पत्रासोबत महाराष्ट्र कृषी सेवा- २०२४ करिता २५८ पदांचे मागणीपत्र आयोगास प्राप्त झाले. सदर पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ मध्ये करण्याबाबत शासनाकडून विनंती करण्यात आली होती.

सदरविषयासंदर्भात मा. आयोगाची दिनांक २३ सप्टेंबर, २०२४ रोजी बैठक घेण्यात आली. सदर बैठकीतील निर्णयानुसार महाराष्ट्र कृषि सेवेतील पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ मध्ये करण्यात येत आहे.

कृषि सेवेतील पदांचा तपशील व शैक्षणिक अर्हतेनुसार अर्ज स्वीकृती संदर्भातील शुद्धिपत्रक लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

३. कृषि सेवेसंदर्भात शुद्धिपत्रक प्रसिद्ध केल्यानंतर उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी देण्यात येईल. सदर अर्ज स्वीकृतीचा कालावधी, नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेऊन प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका छपाईचा कालावधी तसेच माहे ऑक्टोबर २०२४ मध्ये आयोजित इतर संस्थेच्या भरतीप्रक्रिये संदर्भात विविध परीक्षांचे वेळापत्रक, आगामी विधानसभा निवडणुकीची आचार संहिता व निवडणुकीचा अंदाजित कार्यक्रम इत्यादी बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा चे आयोजन सुधारित तारखेस म्हणजेच दिनांक ०१ डिसेंबर, २०२४ रोजी करण्यात येईल.