‘या’ योजनेतंर्गत मिळणार १ लाख ते २५ लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य…
राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना प्रारंभीक टप्प्यावरील पाठबळ देण्यासाठी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना” राज्यामध्ये राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.
योजनेचे उद्दिष्ट व स्वरूप :- १. महाराष्ट्र राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना पाठबळ देणे.
२. राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स व नाविन्यपूर्ण संकल्पना असलेल्या स्टार्टअप्सना व्यवसाय वृद्धीसाठी तसेच विस्तार करणेसाठी एक वेळेस अर्थ सहाय्य करणे.
३. राज्यातील महिला स्टार्टअप्सला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे.
४. देशातील सर्वाधिक महिला स्टार्टअप्स असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण करणे.
५. महिला स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगार निर्मितीला चालना देऊन बेरोजगारी कमी करणे.
६. या योजनेतील एकूण तरतूदीच्या २५ टक्के इतकी रक्कम शासनाद्वारे विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या मागासवर्गातील महिला, आर्थिकदृष्टया मागास वर्गातील महिलांकरीता राखीव ठेवण्यात येईल.
७. राज्यातील महिला नेतृत्वातील प्रारंभिक टप्प्यातील स्टार्टअप्सना त्यांच्या उलाढालीनुसार किमान रू.१ लाख ते कमाल रू. २५ लाखांपर्यंत आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येईल.
लाभार्थी पात्रता :- १. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग, भारत सरकार मान्यता प्राप्त महाराष्ट्र नोंदणीकृत महिला नेतृत्वातील स्टार्टअप्स.
२. सदर स्टार्टअप मध्ये महिला संस्थापक / सह संस्थापक यांचा किमान ५१% वाटा असणे आवश्यक आहे.
३. महिला नेतृत्वातील स्टार्टअप किमान एक वर्षापासून कार्यरत असावा.
४. महिला नेतृत्वातील स्टार्टअपची वार्षिक उलाढाल रु. १० लाख ते रू. १.०० कोटी पर्यंत असावी.
५. महिला नेतृत्वातील स्टार्टअप यांनी राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेमधून अनुदान स्वरूपातील आर्थिक लाभ घेतलेला नसावा. सदर योजना राबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी यांना अंमलबजावणी संस्था म्हणून घोषीत करण्यात येत आहे.
३. अर्ज करण्याची प्रक्रिया :- सदर योजनेकरिता महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या www.msins.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने निशुल्क अर्ज करता येईल.