Take a fresh look at your lifestyle.

मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी ६० कोटी निधी

0

अनुसूचित जातीविषयक कल्याणकारी धोरणाचा मातंग समाजाच्या व्यक्तींना योग्य प्रमाणात लाभ पोहोचण्यासाठी, त्यांचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक विकास होण्याकरिता क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या मंजूर शिफारशींची अमंलबजावणी करणे, तसेच मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र उभारणे व महामंडळामार्फत करण्यात आलेल्या शिफारशींसाठी शासनाने 60 कोटी निधी मंजूर झाल्याबाबतची माहिती साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक मनीष सांगळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

महामंडळाच्या मालकीची अंधेरी (मुंबई), तुळजापूर, (जिल्हा धाराशीव) व अमरावती येथील भूखंडावर मातंग समाज व तत्सम 12 पोटीजातीतील नागरिकांसाठी महामंडळामार्फत बहुउद्देशिय प्रशिक्षण केंद्राची उभारणी करण्याचे नियोजन आहे. त्याकरिता सन 2024-25 या वर्षाच्या पावसाळी अधिवेशामध्ये महामंडळास 30 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे.

थेट कर्ज योजनेची कर्ज मर्यादा 25 हजार वरून एक लाख पर्यंत वाढविण्यात आली आहे. बीजभांडवल योजनेत महामंडळाचा सहभाग 20 टक्क्यांवरून 45 टक्के करण्यात आलेला आहे.एन.एस.एफ.डी.सी. नवी दिल्ली यांच्याकडून 100 कोटी कर्ज पुरवठा मंजूर करण्यात आलेला असून त्यामधुन 3 हजार 500 लाभार्थीना कर्ज वितरण करण्यात येत आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षापासून शैक्षणिक कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत मातंग समाजाच्या गरजू व होतकरू शिक्षणार्थीना देशांतर्गत 30 लाख रुपये व परदेशात उच्च शिक्षणासाठी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर करणेबाबत एनएसएफडीसी, दिल्ली कडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये 10 शिक्षणार्थीना 88.54 लाख निधी मंजूर करण्यात आलेला आहे. यापैकी दोन विद्यार्थ्यांना व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण (Commercial Pilot) व वैद्यकीय शिक्षणासाठी कर्ज मंजूर करण्यात आलेले आहे. कौशल्य विकास प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली असून 25 हजार लाभार्थीना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती ही प्रसिद्ध पत्रकात देण्यात आली आहे.