Take a fresh look at your lifestyle.

ऑगस्टमध्ये दहा हजार शिक्षकांची भरती; जिल्हा परिषदेतील साडेतीन हजार पदांचा समावेश

0

राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केल्याप्रमाणे ३० हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मागील दहा वर्षांतील सर्वात मोठी शिक्षक भरती करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. त्यात जिल्हा परिषदांच्या शाळांमधील २२ हजार पदांचा समावेश आहे. दरम्यान, शासनाच्या निर्णयानुसार २० टक्के पदे रिक्तच राहतील, पण बिंदूनामावलीतील ‘एनटी-सी’ प्रवर्गाच्या आक्षेपामुळे १० टक्के पदे रिक्त ठेवण्यात आली होती.

आता ती पदे ऑगस्टमध्ये भरली जाणार आहेत. यावेळी ज्या खासगी अनुदानित शैक्षणिक संस्थांना मागच्यावेळी पवित्र पोर्टलवर रिक्त पदांची जाहिरात अपलोड करता आली नाही, त्यांनाही संधी मिळणार आहे. याशिवाय बिंदूनामावली अपूर्ण असल्याने ज्या महापालिका, नगरपालिकांना त्यांच्या शाळांमधील शिक्षक भरण्याची जाहिरात अपलोड करता आली नाही, त्यांनाही त्यावेळी रिक्त पदांवर शिक्षक मिळणार आहेत.

खासगी संस्थांना ‘पवित्र’वरूनच उमेदवार – खासगी अनुदानित संस्थांच्या मनमानीला आवर घालत आता त्यांची शिक्षक भरती देखील पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच होत आहे. एका रिक्त पदासाठी दहा उमेदवार त्या संस्थेत पाठविले जातात. मुलाखतीच्या माध्यमातून त्या दहापैकी एका उमेदवाराची शिक्षक म्हणून निवड करता येईल. त्या दहा उमेदवारांशिवाय अन्य दुसरा उमेदवार शिक्षक म्हणून संस्थेला घेताच येत नाही.

शिक्षक भरतीपूर्व ‘टीईटी’ ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये -शिक्षक होण्यासाठी डीएड-बीएड उत्तीर्ण उमेदवारांना टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) पास व्हावी लागते. त्यानंतर बीएडधारक उमेदवारांना नोकरीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ‘टीईटी’ घेण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासंबंधीची निविदा काढण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये ‘टीईटी’ घेतली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

कशी करायची नोंदणी :– सध्या ‘पवित्र’ पोर्टल वर उमेदवारांना नोंदणी करावी लागणार असून त्यामध्ये त्यांना प्राधान्यक्रम, जातसंवर्ग, विषयानुसार माहिती अपलोड करावी लागणार आहे.

त्यानंतर संबंधित जिल्हा परिषदांच्या अंतिम बिंदुनामावलीनुसार कागदपत्रे व गुणांची पडताळणी होवून उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल आणि अंतिम निवडी होतील; असे भरतीचे टप्पे आहेत.