मुख्यमंत्री : वयोश्री योजने’साठी अर्ज करण्याचे सामाजिक न्याय विभागाचे आवाहन
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री-वयोश्री योजना’ सुरू करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेसाठी मुंबई विभागातील जिल्हयांच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त मुंबई विभाग वंदना कोचुरे यांनी केले आहे.
राज्यातील 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने,उपकरणे खरेदी करणेकरीता तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. व्दारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना”सामाजिक न्याय विभागातर्फे सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना 3 हजार रुपयांच्या मर्यादेत डीबीटी प्रणालीव्दारे निधी वितरीत करण्यात येणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा अर्ज प्राप्त करण्यासाठी व योजनेसंबंधी अधिक माहितीसाठी मुंबई विभागातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कार्यालयांशी संपर्क साधावा व या योजनेचा लाभ घ्यावा अशी माहिती प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.