Take a fresh look at your lifestyle.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी ‘रेशन कार्ड’ वाटप करणेबाबत शासनाच्या सूचना जारी…

0

राज्यामध्ये “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना” सुरू करण्यास दि.२८.०६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यांत आली आहे. सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये शिधापत्रिकेचा सुध्दा समावेश आहे. त्यामुळे शिधापत्रिकेमध्ये नांव चढवणे, नांव कमी करणे, नवीन शिधापत्रिका काढणे इ. शिधापत्रिकेशी संबंधीत कामांसाठी शिधापत्रिका कार्यालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.

२. राज्यामध्ये दि. ५ मे, १९९९ पासून तिहेरी कार्ड योजना लागू करण्यात आली आहे.

त्यानुषंगाने राज्यामध्ये सर्व शिधापत्रिकाधारकांना निकषाप्रमाणे तीन रंगाच्या (पिवळी, केशरी व शुभ्र शिधापत्रिका वितरीत करण्यात येत आहेत. तद्नंतर शासन निर्णय २१.०२.२०२३ अन्वये अंत्योदय अन्न योजना (AAY), प्राधान्य कुटुंब योजना (PHH), APL शेतकरी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेव्यतिरिक्त (NPH) व APL शेतकरी व्यतिरिक्त व APL शुभ्र शिधापत्रिका धारकांना विहितशुल्क आकारून ई-शिधापत्रिका वितरीत करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. तद्नंतर सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या (अंत्योदय अन्न योजना (AAY) व प्राधान्य कुटुंब योजना (PHH ) ) व राज्य योजनेच्या (आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील APL शेतकरी) अशा सर्व शिधापत्रिकाधारकांना ऑनलाईन सेवेद्वारे ई – शिधापत्रिका सुविधा विनामुल्य उपलब्ध करून देण्याचा दि. १६.०५.२०२३ च्या शासन निर्णयान्वये निर्णय घेण्यात आला आहे.

३. शिधापत्रिका वितरीत करतांना घ्यावयाची काळजी व दक्षता या संदर्भात शासन परिपत्रक दि. २९.०६.२०१३ अन्वये सुचना देण्यात आलेल्या आहेत. पिवळ्या, केशरी व शुभ्र शिधापत्रिकांसाठी नाममात्र शुल्क संदर्भाधीन शासन निर्णयान्वये दि. ०१.०१.२००२ अन्वये निश्चित केले आहे.

४. तरी, मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण या योजनेच्या अनुषंगाने परि. क्र. २ व ३ मधील तरतुदींनुसार कोऱ्या शिधापत्रिका व ई-शिधापत्रिका तातडीने लाभार्थ्यांना वितरीत करण्यात याव्यात. शिधापत्रिका वितरणामध्ये कोणताही गैरव्यवहार होणार नाही याची दक्षता घ्यावी.