काय आहे लखपती दीदी योजना; कोणाला मिळणार लाभ?
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. याच दरम्यान अर्थमंत्र्यांनी ‘लखपती दीदी’ योजनेचा उल्लेख केला आहे. 1 कोटी महिला लखपती दीदी बनल्या, आता 3 कोटींचं लक्ष्य असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे.
“लखपती दीदींना आणखी प्रोत्साहन दिलं जाणार आहे, लखपती दीदी योजनेचं लक्ष्य दोन कोटींवरून तीन कोटींपर्यंत वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.”
“9 कोटी महिलांच्या आयुष्यात बदल झाला. लखपती दीदींमुळे अनेक महिला स्वावलंबी झाल्या आहेत. अंगणवाडी कार्यक्रमांना गती दिली जात आहे. आतापर्यंत एक कोटी महिलांना लखपती दीदी करण्यात आलं आहे” अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. अर्थसंकल्पात सांगितलेली लखपती दीदी योजना नेमकी काय आहे आणि त्याचे फायदे काय आहेत हे जाणून घेऊया
लखपती दीदी योजनेचे फायदे
1. महिलांना आर्थिक गोष्टींचं ज्ञान मिळावं यासाठी व्यापक आर्थिक साक्षरता कार्यशाळा चालवल्या जातात. ज्याद्वारे बजेट, बचत, गुंतवणूक यासारख्या गोष्टींची माहिती दिली जाते.
2. योजनेअंतर्गत महिलांना बचतीसाठी प्रोत्साहन दिलं जातं.
3. लखपती दीदी योजनेंतर्गत, महिलांना सुविधा पुरविल्या जातात, ज्याद्वारे त्यांना कर्ज मिळतं.
4. या योजनेत कौशल्य विकास आणि व्यावसायिक प्रशिक्षणावर भर दिला जातो. उद्योजक बनू इच्छिणाऱ्या महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन केलं जातं.
5. या योजनेत महिलांना आर्थिक सुरक्षा देखील देण्यात आली आहे. यासाठी विमा संरक्षण दिलं जातं. यामुळे त्यांच्या कुटुंबाची सुरक्षाही वाढते.
6. लखपती दीदी योजनेअंतर्गत, महिलांना डिजिटल बँकिंग सेवा, मोबाईल वॉलेट्स आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्म पेमेंटसाठी वापरण्यास प्रोत्साहित केलं जातं.
7. या योजनेत अनेक प्रकारचे सक्षमीकरण कार्यक्रमही चालवले जातात, ज्यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो.