Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांसाठी वरदान; नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

0

जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राज्याच्या निवडक जिल्ह्यांमध्ये हवामान-अनुकूल शेती आणि अल्पभूधारक शेतकरी यांची शेती किफायतशीर करण्यासाठी राबविण्यात येत आहे. हा प्रकल्पात राज्यातील अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव, परभणी, वर्धा, वाशीम, यवतमाळ, बुलडाणा, जळगाव, जालना व नाशिक या १६ जिल्ह्यांमधील ५2२० अवर्षणप्रवण गावांचा समावेश असून यामध्ये पूर्णा नदीच्या खोऱ्यातील ९३२ खारपाण गावांचा समावेश आहे. या प्रकल्पाची मंजूर किंमत रु. 4000 कोटी होती. मात्र प्रकल्पाची यशस्विता व थेट लाभ हस्तांतरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अर्जांच्या दायित्वाच्या अनुषंगाने रु. 5469 कोटींच्या सुधारित प्रकल्प खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या यशस्वितेमुळे प्रकल्पामध्ये सद्य:स्थितीत समाविष्ट असलेल्या १६ जिल्ह्यांसह विदर्भातील उर्वरित नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली अशा एकूण २१ जिल्ह्यांमध्ये रु. ६००० कोटी किंमतीचा प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्यास शासनाने तत्वतः मान्यता दिली असून गाव निवड समितीच्या बैठकीत प्राप्त निर्देशांनुसार हवामानास अधिक संवेदनशील गावसमूह व त्यामधील गावे यांची निवड करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू आहे.