अंत्योदय अन्न योजनेतंर्गत यांना मोफत मिळणार साडी…
संदर्भ :- सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या शासन निर्णय क्र. सपववि-३७०१२/ ९८/२०२३DESKTEX-२-CMTD, दि.१०.११.२०२३ सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या उपरोक्त संदर्भाधिन शासन निर्णय दि.१०.११.२०२३
अन्वये राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटूंबांना दरवर्षी प्रतिकुटूंब एक साडी मोफत वितरीत करण्याबाबतच्या कॅप्टिव्ह मार्केट योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. सदर योजनेंतर्गत राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दरवर्षी प्रतिकुटूंब एक साडी मोफत वितरीत करण्यात येणार आहे.
२. सदर योजनेकरीता महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाची नोडल संस्था म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. महामंडळामार्फत अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटूंबाच्या यादीनुसार साड्यांचे गठ्ठे तयार करून रास्तभाव दुकानाच्या नावानुसार विभागाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या तालुकास्तरावरील गोदामापर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत. महामंडळाने सार्वजनिक वितरण व्यवस्था (PDS) यंत्रणेकडील गोदामापर्यंत साड्यांचा पुरवठा केल्यानंतर तेथून अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटूंबापर्यंत साडी वाटप करण्याची व त्यावर देखरेख करण्याची जबाबदारी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची राहणार आहे.

३. सदर योजनेंतर्गत साड्यांचे वितरण प्रजासत्ताक दिन (दिनांक २६ जानेवारी, २०२४) ते होळी (दिनांक २४ मार्च, २०२४) या सणांच्या दरम्यान करण्याबाबत शासनाने निश्चित केलेले आहे. त्यानुसार राज्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावातील रास्तभाव दुकानापर्यंत विहित वेळेत साड्या पोहोचतील याची दक्षता घेण्याबाबत सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाद्वारे राज्य यंत्रमाग महामंडळास कळविण्यात आलेले आहे.
४. सबब, महामंडळाकडून तालुकास्तरावरील गोदामापर्यंत ज्याप्रमाणात साड्यांचा पुरवठा करण्यात येईल त्याप्रमाणात तात्काळ अंत्योदय शिधापत्रिकाधारकांपर्यंत साड्यांचे वाटप करण्याबाबत आपल्या स्तरावरून आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच साठवणूक व हाताळणी करताना साड्या खराब होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी.