तलाठी पदाच्या निवडीसाठी आवश्यक कागदपत्रे…
तलाठी पदासाठी अर्ज केलेला उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व त्याचेकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
तलाठी पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी शासन निर्णय क्र. रिपभ/प्र.क्र / ६६ / २०११/ई-१० दि. १७ जून २०११ नुसार ज्या परिक्षार्थीकडे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) उपलब्ध नसल्यास त्यांनी त्यांचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला असल्याचा जन्म दाखला (Birth Certificate) सादर करणे आवश्यक आहे. अशा प्रकरणात अधिवास प्रमाणपत्राची अट लागू राहणार नाही. सदर परिक्षार्थीकडे अधिवास प्रमाणपत्र तसेच जन्म तारखेचा दाखला उपलब्ध नसल्यास, त्या परिक्षार्थीने आपला शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे आवश्यक राहील. परंतू सदर शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये त्या परिक्षार्थीचा जन्म हा महाराष्ट्र राज्यात झाल्याची नोंद असणे आवश्यक आहे. अशा प्रकरणात अधिवास प्रमाणपत्राची अट लागू राहणार नाही. ज्या उमेदवाराचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला नसेल परंतू महाराष्ट्र राज्यातील रहिवास सलग १५ वर्षे व त्यापेक्षा अधिक कालावधीचा आहे अशा परीक्षार्थी / उमेदवारांसाठी अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) आवश्यक राहील.
उमेदवाराने अर्ज केला अथवा विहित अर्हता धारण केली म्हणजे परीक्षेला बोलाविण्याचा अथवा नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही.
आरक्षित मागास प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना ज्या संदर्भातील सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र (Caste Certificate) व उपलब्ध असल्यास जात वैधता प्रमाणपत्र (Validity Certificate) निवडीअंती सादर करणे आवश्यक आहे.
जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. बीसीसी-२०११/प्र.क्र.१०६४/२०११/१६-ब, दि. १२/१२/२०११ मधील तरतुदीनुसार, याचिका क्र. २१३६/२०११ व अन्य याचिकांवर मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. २५/८/२०११ रोजी दिलेल्या आदेशाच्या विरोधात मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे दाखल केलेल्या एसएलपी मधील आदेशाच्या अधीन राहून तात्पूरते नियुक्त आदेश निर्गमित केल्याच्या दिनांकापासून ०६ महिन्याचे आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे, अन्यथा त्यांची नियुक्ती पुर्वलक्षी प्रभावाने रद्द करण्यात येईल.
उमेदवारांना परीक्षेसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल. परिक्षेसाठी नेमून दिलेल्या परिक्षा केंद्रावर दिलेल्या वेळेपुर्वी १ तास अगोदर उपस्थित रहावे.
नियुक्ती होणाऱ्या उमेदवारास शासन निर्णय दि. २१/१०/२००५ नुसार लागु करण्यात आलेली नवीन परिभाषिक अंशदायी निवृत्तीवेतन योजना (New Defined Contributory Pension Scheme) लागू राहील. त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेनाचे अंशराशीकरण)नियम १९८४ आणि सर्वसाधारण भविष्य निर्वाहनिधी योजना लागू राहणार नाही. तथापि, सदर नियमात भविष्यात काही बदल झाल्यास त्याप्रमाणे योजना लागू राहील.

सदर भरती प्रक्रिया राज्यस्तरावरुन एकत्रितरित्या राबविली जात असली तरी, सदर तलाठी संवर्गाची यादी तयार करताना त्या- त्या जिल्हयात भरावयाच्या पदांचा विचार करुन, प्रत्येक जिल्हयाची स्वतंत्र निवड यादी तयार करण्यात येऊन त्यानुसार प्रत्येक जिल्हयाची स्वतंत्र निवड यादी जाहीर केली जाईल. उमेदवारास मिळालेले गुण त्याने अर्ज केलेल्या जिल्हयाकरीताच विचारार्थ घेतले जातील व त्याचा अन्य जिल्हयातील निवड यादीशी कोणताही संबंध असणार नाही.