‘आई’ या योजनेतंर्गत महिलांना मिळणार ‘या’मध्ये 50% सवलत…
राज्य शासनाच्या 19 जून 2023 रोजीच्या ‘आई’ महिला केंद्रित / लिंग समावेशक (Gender Inclusive) पर्यटन धोरणानुसार महिला पर्यटकांसाठी आणि महिला उद्योजकांसाठी एमटीडीसीच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. या धोरणाचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर 1 ते 8 मार्च 2024 हे आठ दिवस महामंडळाच्या सर्वोत्कृष्ट पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी 50 टक्के इतकी सूट देण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
मंत्री श्री.महाजन म्हणाले, एमटीडीसीची रिसॉर्ट / पर्यटक निवास ही राज्याच्या कानकोपऱ्यात महत्त्वाच्या ठिकाणी वसलेली आहेत. महामंडळाची एकूण 34 पर्यटन निवासे, 27 उपहारगृहे असून, निवास व न्याहा महाकलाग्राम इ.यांसारखे अनुभवात्मक उपक्रम आहेत. तसेच अलीकडेच जबाबदार पर्यटन अंतर्गत एमटीडीसीने मोठ्या प्रमाणात वाटचाल सुरु केली आहे. त्याचप्रमाणे बीच रिसोर्ट, हिल रिसोर्ट, जंगल रिसोर्ट असे विविध पद्धतीचे पर्यटक निवास व उपहारगृहे तसेच बोट क्लब, स्कूबा डायविंग इ. जलक्रीडा केंद्र पर्यटकांना आकर्षित करतात.

1975 मध्ये स्थापन झाल्यापासून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ ही संपूर्ण महाराष्ट्रामधील प्रथम क्रमांकाची आणि कायम अग्रस्थानी येणारी पर्यटन संस्था आहे. ‘अतिथी देवो भव’ या मूल्यांची पुरेपूर अंमलबजावणी महामंडळ पर्यटक निवासामध्ये येणाऱ्या पर्यटकांचे आदरातिथ्य उत्तमरित्या करणारे महाराष्ट्रामधील नामवंत महामंडळ म्हणून एमटीडीसीकडे पाहिले जाते. महिलांसाठीच्या सवलतीचा लाभ पर्यटकांनी घ्यावा, असे आवाहन श्री. महाजन यांनी केले आहे. या संधीचा लाभ घेण्याकरिता महामंडळाच्या https://www.mtdc.co.in/ या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी. यासाठी नियम व अटी आहेत. आपले ओळखपत्र असणे आवश्यक आहे. ही सवलत केवळ महिला पर्यटकांसाठी आहे. महिला पर्यटक निवासात प्रवेश करताना (चेक-इनच्या) वेळी उपस्थित असणे अनिवार्य आहे.