कामगार व त्यांच्या कुटूंबासाठी आर्थिक सहाय्य योजना…
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे (MSCE) या शासकीय संस्थेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शासकीय संगणक टंकलेखन अभ्यासक्रम उत्तीर्ण करणाऱ्या कामगार व त्यांच्या कुटुंबियांना अभ्यासक्रमाकरिता भरलेल्या १०० टक्के शुल्क रक्कमेच्या ५० टक्के रक्कम सहाय्यता म्हणून सन २०२३-२४ या वर्षापासून शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परिक्षा (GCC-TBC) आर्थिक सहाय्य योजना” खालील नियम व अटीच्या अधीन राहून लागू करण्यात येत आहे.

योजनेच्या नियम व अटी
१. मंडळाकडे कामगार कल्याण निधी (MLWF) भरणाऱ्या (लाईन धारक) कामगार व त्यांच्या कुटुंबियांना सदर योजनाचा लाभ घेता येईल.
२. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगार/कामगार कुटुंबियांना मंडळाच्या कामगार केंद्राचे सर्वसाधारण वार्षिक सभासद होणे आवश्यक आहे.
३. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या संगणक टंकलेखन बेसिक कोर्स इन कॉम्प्युटर टायपिंग मराठी-३०/४० किंवा हिंदी – ३०/४० शब्द प्रती मिनिट (६ महिने) या पैकी एका अभ्यासक्रमासाठी तसेच इंग्रजी-३०/४० शब्द प्रती मिनिट (६ महिने) या पैकी एका अभ्यासक्रमासाठी अशा प्रकारे दोन वेळा ५० टक्के मर्यादित अर्थसहाय्य देता येईल. याप्रमाणे एक किंवा दोन अभ्यासक्रम पूर्ण असलेल्या अर्जदारास अर्थसहाय्य मंजूर करण्यात यावे.
४. शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परिक्षा किमान ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण कामगार व कामगार कुटुंबियांना अभ्यासक्रमाकरिता भरलेल्या एकूण फी / शुल्काच्या ५० टक्के रक्कम अनुदान म्हणून मंडळामार्फत मंजूर करण्यात येईल. दिव्यांग अर्जदारास ५० टक्के गुणांची अट राहणार नाही व किमान उत्तीर्ण अर्जदारास एकूण फी / शुल्काची सरसकट १०० टक्के रक्कम अनुदान मजूर करण्यात येईल. (एकूण फी / शुल्कामध्ये अभ्यासक्रमाकरीता भरलेल्या प्रवेश शुल्क, मासिक शिकवणी शुल्क, परीक्षा शुल्क व परीक्षा सामग्री या सर्व रक्कमेचा समावेश राहील.)
५. अर्जदाराने अर्ज सादर केल्याच्या तारखेपासून कमाल मागील १ वर्षामध्ये शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परिक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
६. अर्जदाराने नियम व अटीचे पालन करून मंडळाच्या https://public.mlwb.in/public या वेबपोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने विहित मुदतीत अर्ज सादर करावा.