सव्वा लाखाचे अनुदान; या प्रवर्गातील लोकांना मिळणार घरकुल योजनेचा लाभ…
विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेच्या माध्यमातून घरकुलासाठी अनुदान देण्याची तरतूद आहे. मात्र, योजनेच्या जाचक अटींमुळे आतापर्यंत या योजनेला प्रतिसादच मिळाला नाही. आता योजनेच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यात आल्यामुळे यंदा लाभार्थीचा भरपूर प्रतिसाद मिळाला असून, समाज कल्याण विभागाकडे दोन ते अडीच हजार प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. सध्या प्रस्तावांच्या छाननीचे काम सुरू आहे.

काय आहे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना:- विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या नागरिकांची गावोगावी होणारी भटकंती थांबवण्यासाठी त्यांना हक्काचे घरकुल देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुरु करण्यात आली आहे. या समाजाचे राहणीमान उंचाविणे हा या योजनेचा उद्देश आहे.
पात्रता:- विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांनाच दिला जातो. लाभार्थी हा गावोगावी भटकंती करून आपला उदरनिर्वाह करत असावा. त्याचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी असावे. महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
१.२० लाखाचे अनुदान:- परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त झाल्यास संबंधित लाभार्थीला घरकुल उभारण्यासाठी शासनाकडून १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे:- विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या नागरिकांना जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र, जागेचे जिओ टॅगिंग आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
-पी. जी. वाबळे, सहायक आयुक्त, समाज कल्याण