प्रोसेस मॅपिंग मॅन्युअलमुळे राज्यातील जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या कामाचे विभाजन करणे सोपे जाणार
महाराष्ट्रातील ३४ जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद प्रशासन काम करत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागातील तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी
जिल्हा परिषद प्रशासन एक स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून कार्यरत असते. या योजना राबवित असताना व ग्रामीण जनतेला विविध सेवा देत असताना जिल्हा परिषद व जिल्हा परिषद प्रशासनाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. जिल्हा परिषदेचे काम अधिक गतिमान पद्धतीने करण्यासाठी व कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा परिषद पुणे यांनी प्रोसेस मॅपिंग हा प्रकल्प राबविला आहे. सदर प्रकल्प राबवण्यासाठी श्री आयुष प्रसाद मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा
परिषद पुणे यांचे अभिनंदन करतो. त्यांच्या संकल्पनेतून व ग्रामसेवक प्रशिक्षण संस्था मांजरी फार्म पुणे यांच्या सहकार्याने प्रोसेस मॅपिंग मॅन्युअल तयार करण्यात आलेले आहे. हे मॅन्युअल संपूर्ण राज्यातील जिल्हा परिषदेसाठी व त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी
एक दिशादर्शक व मार्गदर्शकाची भूमिका बजावणार आहे. या प्रोसेस मॅपिंग मॅन्युअलमुळे जिल्हा परिषदेमधील अधिकारी व कर्मचारी यांच्या कामाचे विभाजन करणे सोपे जाणार आहे. तसेच माहिती तंत्रज्ञान व संगणकाचा कार्यक्षम व प्रभावी वापर करता येणार आहे.
या बाबींमुळे प्रशासन आणखी लोकाभिमुख व गतिमान होण्यास मदत होणार आहे. या मधून जनतेला वेळेत सेवा देता येतील व सेवेची हमी देता येईल.