शासन निर्णय! शासकीय सेवेतील गट-अ व गट-ब कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर मिळणार शासकीय सेवेत संधी
शासन निर्णय,सामान्य प्रशासन विभाग, क्र.अकंपा -१२१७/प्र.क्र.१०२/का-८,
दि.२१.०९.२०१७
संदर्भाधीन शासन निर्णयाद्वारे अनुकंपा नियुक्ती धोरणातील सर्व तरतूदींचे एकत्रिकरण
करण्यात आले आहे. प्रचलित अनुकंपा नियुक्ती धोरणानुसार गट-क व गट-ड मधील राज्य
शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवेत असताना निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास गट-क व
गट-ड मधील पदावर अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात येते. अनुकंपा नियुक्तीचे मुख्य प्रयोजन हे, “शासकीय सेवेत असताना कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास
त्याच्या कुटुंबावर ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीतून कुटुंबास बाहेर काढण्यासाठी आणि या आपत्तीजनक परिस्थितीवर मात करण्यास मदत करण्यासाठी संबंधित मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील एका पात्र सदस्यास शासकीय सेवेत अनुकंपा (सहानुभूती) म्हणून नियुक्ती देणे” असे आहे. उपरोक्त प्रयोजन तसेच कोविडची पार्श्वभूमी विचारात घेता, गट-क व गट-ड मधील राज्य
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच गट-अ व गट-ब मधील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना देखिल ही योजना
लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय
दिनांक २६ ऑगस्ट,२०२१ रोजीच्या मा.मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार
खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहेत
अ) गट-क व ड मधील शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे, अनुकंपा तत्वावर नियुक्तीचे धोरण, गट-
अ आणि ब मधील शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येत आहे. त्यानुसार शासकीय सेवेत
असताना गट-अ व गट-ब मधील दिवंगत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील पात्र सदस्यास गट-क
व गट-ड मध्ये अनुकंपा नियुक्ती अनुज्ञेय करण्यात येत आहे.
ब) कोविडच्या पार्श्वभूमीवर सदर योजनेचा लाभ हा दिनांक १ जानेवारी,२०२० पासून अनुज्ञेय
करण्यात येत आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर
उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०९२७१६५६०३९५०७ असा आहे. हा आदेश
डिजीटल स्वाक्षरीने सांक्षाकित करुन काढण्यात येत आहे.