सारथी मार्फत गुणवंत विद्यार्थ्यांना परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजना
महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठामध्ये प्रवेश घेता येत नाही. विद्यार्थ्यांची गुणवत्ता असून आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागते. मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जातीतील मुलामुलींना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी परदेशी शिष्यवृत्ती योजना लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुषंगाने मा. मंत्रीमंडळाने दिनांक ०४.०७.२०२३ रोजी घेतलेल्या निर्णयास अनुसरुन याबाबत सविस्तर शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

शासन निर्णय :- महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा प्रवर्गातील जे गुणवंत विद्यार्थी पदव्युत्तर पदवी/पदविका व पीएचडी अभ्यासक्रमासाठी QS World Ranking मध्ये २०० च्या आत रॅन्कींग असलेल्या शैक्षणिक संस्था/ विद्यापीठामध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश घेतील अशा मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा प्रवर्गातील एकत्रितपणे ७५ विद्यार्थ्यांना प्रतीवर्षी परदेशी शिष्यवृत्ती मंजूर करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

२. सदरची योजना छत्रपती शाहू महाराज व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या शासनाच्या संस्थेमार्फत “सयाजीराव गायकवाड-सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना” या नावाने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून राबविण्यात येईल.