सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या ‘या’ कर्जाच्या रकमेत वाढ, ‘या’ लाभार्थ्यांना मिळणार कर्ज…
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजातील (चांभार, गोची, ढोर व होलार) व्यक्तींच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी एनएसएफडीसीच्या योजनांसाठी कर्जाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे.
तसेच सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळाच्या (एनएसएफडीसी) राज्य व केंद्र सरकारच्या योजनेसाठी 4,800 लाभार्थ्यांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे, अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धम्मज्योती गजभिये यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे.
या योजनांतील मुदती कर्ज योजनेअंतर्गत लहान उद्योग 1 लाख रुपये, दीड लाख व 2 लाख रुपये, चर्मोद्योग 2 लाख रुपये, लघुऋण वित्त योजना व महिला समृध्दी योजना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्यात येतील. मुदती कर्ज योजनेअंतर्गत लहान उद्योगासाठी 5 लाख रुपये, लघुऋण वित्त योजना व महिला समृध्दी योजना प्रत्येकी 1.40 लाख प्रकल्प मर्यादा तसेच एनएसएफडीसी यांची महिलांकरीता 5 लाखांची नव्याने महिला अधिकारिता योजना सुरू करण्यात आली आहे.

तसेच शैक्षणिक कर्ज योजनेमध्ये वाढ झाली असून देशामध्ये शिक्षणासाठी 20 लाख व परदेशात शिक्षणासाठी 30 लाखांपर्यंत कर्ज मिळणार असल्याची माहिती श्री. गजभिये यांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या जिल्हा कार्यालयाला भेट द्यावी, असं आवाहनही करण्यात आलं आहे.