Take a fresh look at your lifestyle.

कमवा शिका योजनेतून शिक्षण आणि रोजगारदेखील मिळणार…

0

जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी ‘कमवा व शिका’ ही योजना राबविण्यात येत आहे. अशा पद्धतीचा एकाचवेळी शिक्षण व रोजगाराचा प्रयोग करणारी पुणे ही पहिलीच जिल्हा परिषद ठरली आहे.

युवकांना जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सलग तीन वर्षे प्रशासकीय कामांचा अनुभवही घेता येणार आहे. या योजनेमुळे प्रशासकीय कामकाज गतिमान झाले आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षांत नव्याने विद्यार्थ्यांना काम करण्याची संधी दिली जाणार आहे, अशी माहिती झेडपीच्या समाजकल्याण विभागाकडून देण्यात आली.

कमवा शिका योजनेतून अनुसूचित जाती, जमाती, भटक्‍या विमुक्त जाती-जमातींच्या 18 ते 22 वयोगटातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यालयात तीन वर्षे प्रशासनासोबत काम करता येईल. पहिल्या वर्षी 8 हजार रुपये, दुसऱ्या वर्षी 9 हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी 10 हजार रुपये मासिक मानधन दिले जाते. या विद्यार्थ्यांनी तीन वर्षे काम केल्यानंतर त्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची पदवी मिळते.

अशी होईल निवड:– कमवा शिका योजनेतून काम करण्याची संधी मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा द्यावी लागेल. त्यानंतर मुलाखतीमधून विद्यार्थ्याची निवड केली जाते. परीक्षा कधी होणार यासंदर्भात सविस्तर माहिती लवकरच जाहीर केले जाईल. ही परीक्षा एमकेसीएलमार्फत घेण्यात येणार आहे, अशी माहिती झेडपीकडून देण्यात आली.

अनुभव प्रमाणपत्र देणार:– कमवा व शिका योजनेसाठी निवड झालेल्या उमेदवारांना सलग तीन वर्षे प्रशासकीय कामाचा अनुभव घेता येणार आहे. या सर्वांना त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर जिल्हा परिषदेच्यावतीने अनुभव प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. या उपक्रमामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, प्रशासकीय कामाचा अनुभव, मानधन आणि अनुभव प्रमाणपत्र असा एकाचवेळी चार प्रकारचा लाभ मिळणार आहे. या अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे.

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

जात प्रमाणपत्र

शिधापत्रिका- मागील आणि पुढील बाजू

दहावी उतीर्ण प्रमाणपत्र

बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र (बारावी परीक्षेला बसलेले विद्यार्थी हे त्यांचे हॉल तिकीट अपलोड करू शकतात परंतु प्रत्यक्ष मुलाखतीच्या दिवसा पर्यन्त त्यांनी पास होणे आणि तसे प्रमाणपत्र दाखवणे आवश्यक )

सक्षम अधिकार्‍याने दिलेले दारिद्रय रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र असल्यास

सक्षम अधिकार्‍याने दिलेला उत्पन्न दाखला

MS-CIT संगणक परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र