Take a fresh look at your lifestyle.

विद्यार्थ्यांनो, आता तुम्हाला मिळणार ऑन जॉब ट्रेनिंग आणि इंटर्नशिप…

0

मुंबई- महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठांशी बुधवारी १२ उद्योग समूहांशी सामंजस्य करार केल्यामुळे कौशल्य पूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२३- २४ पासून विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण, ऑन जॉब ट्रेनिंग आणि इंटर्नशिप सुविधा उपलब्ध होणेसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत, असे मत कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले.

मंत्रालयातील दालनात महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे विविध उद्योगसमूहाशी सामंजस्य करार कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत पार पडले. कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ अपूर्वा पालकर, यासह सॅप इंडिया, रेडहट, मायक्रोसॉफ्ट, सेर्टी पोर्ट ,एमईडीसी, मॅक, एनआरएआय, संचेती,सीएसडीसीआय यासह विविध उद्योगसमूहाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

मंत्री लोढा म्हणाले की , उद्योजकता आणि नाविन्यता विद्यार्थ्यांमध्ये रुजवावी या मुळ उद्देशाने महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची स्थापना केली असून या विद्यापीठाने वेगात प्रगती सुरू केली आहे. पाच कौशल्य प्रशाला, एकवीस नवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी शासन अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे. याच माध्यमातून अनेक उद्योगसमूहाशी सामंजस्य करार देखील करण्यात आले आहेत. ऑन जॉब ट्रेनिंग सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध होणेसाठी विविध संस्थांशी प्रत्यक्ष बोलणी करून शैक्षणिक वर्ष २०२३- २४ पासून विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण, ऑन जॉब ट्रेनिंग आणि इंटर्नशिप सुविधा उपलब्ध होणेसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत.

जागतिक दर्जाच्या शिक्षणातून अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. यासाठी या सर्व उद्योग समूहाचे सहकार्य मिळेल. मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना अशाप्रकारे प्रशिक्षित करून देशात आणि परदेशातही चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळतील. डिजिटल व्हिडिओ प्लॅटफॉर्म, विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान शिकवणे यातून कौशल्य युक्त विद्यार्थी घडण्यास मदत होईल. सर्वप्रथम या सर्व उद्योगसमूहांचे मी आभार मानतो. राज्यातील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या नोकरीच्या संधी देखील उपलब्ध होण्यास मदत होणार आहे असे ही मंत्री लोढा म्हणाले.