तुम्हाला ‘या’ क्षेत्रात करिअर करायचंय? जाणून घ्या संपूर्ण माहिती
देशात वाढत्या जागरूकतेमुळे आयुर्विमा आणि जनरल इन्शुरन्सचा व्यवसायही झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत या क्षेत्रात विविध स्तरांवर कुशल तरुणांना रोजगार मिळण्याच्या शक्यताही सातत्याने वाढत आहेत.
जागतिक महामारीनंतर विम्याचे महत्त्व आणि त्याची गरज पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे. आयुष्याच्या बाबतीतील अनिश्चिततेमुळे या वातावरणात प्रत्येकाला आपल्या भविष्याच्या सुरक्षिततेबद्दल खात्री हवी असते. विमा क्षेत्राचे डिजिटायझेशन आणि त्यात तंत्रज्ञानाचा समावेश केल्यानेही अनेक आमूलाग्र बदल घडून आले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन आणि इंटरनेट ऑफ थिंग्जने विमा कंपन्यांचे संपूर्ण कामकाजच बदलून टाकले आहे. यामुळे या क्षेत्रातील तरुणांसाठी करिअरची नवी दारे खुली झाली आहेत.
विमा आज प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. या क्षेत्राची व्याख्या करायची झाली, तर आपल्याला होणाऱ्या नुकसानीची भरपाई. चोरी, अपघात, आग किंवा तत्सम प्रसंगामुळे झालेलं नुकसान भरुन काढण्यासाठी दोन पक्षांमध्ये झालेल्या करारानुसार विशिष्ट रक्कम दिली जाते. हा करार विमा कंपनी आणि व्यक्ती/संस्था/संघटना यांच्यामधे झालेला असतो. विमा स्वीकारणारी व्यक्ती (इन्शुरर) आणि विमाधारक (इन्शुअर्ड) यांच्यादरम्यानचा हा करार असतो.
असे आहेत इन्शुरन्सचे प्रकार
1. जीवन विमा
2. आरोग्य विमा
3. वस्तूंचा विमा
4. उपकरणांचा विमा
5. इमारतींचा विमा
6. व्यवसाय विमा
7. प्रवास विमा
इन्शुरन्स क्षेत्रात पुढील पदावर करता येतं काम
1. इन्शुरन्स एजंट
2. इन्शुरन्स अंडररायटर
3. इन्शुरन्स सर्व्हेअर
4. अॅक्चुअरी (Career in Insurance Sector)
5. अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर
6. अकाउंट्स अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर
7. डेव्हलपमेंट ऑफिसर
पात्रता:– इन्शुरन्स आणि अॅक्चुरिअल्स क्षेत्रात करिअर करायचं, तर बारावीनंतर किंवा ग्रॅज्युएशननंतर एखाद्या कोर्सला प्रवेश घेता येईल. इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीचे (आयआरडीए) अधिकृत पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रम काही संस्थांमध्ये उपलब्ध आहेत. यासाठी बॅचलर डिग्री पास असणं आवश्यक आहे तसेच, इन्शुरन्स क्षेत्रातील कामाचा दोन वर्षांचा अनुभव गाठीशी असायला हवा. बहुतांशी विमा कंपन्या भरतीच्या वेळी कर्मचाऱ्यांना कामाचं प्रशिक्षण देतात.

मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये बीकॉम इन बँकिंग अँड इन्शुरन्स कोर्स उपलब्ध आहे. युनिव्हर्सिटीशी संलग्न असणाऱ्या कॉलेजांमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे.