Take a fresh look at your lifestyle.

मध्य रेल्वेने भंगार विक्री करून कमावले ‘एवढे’ कोटी….

0

देशातील मध्य रेल्वेच्या शून्य भंगार मोहिमेअंतर्गत आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये मध्य रेल्वेने वर्षभरात भंगार विक्रीतून 483 कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. मध्य रेल्वेने केवळ भंगार विक्री करून एवढी मोठी कमाई केली आहे. 

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेने सर्व स्थानके, डेपो, कार्यशाळा, शेड, सर्व रेल्वे स्थाने/विभाग, प्रतिष्ठाने भंगारमुक्त करण्यासाठी ‘शून्य भंगार मोहीम’ यशस्वी करण्यासाठी पाऊले उचलली आहेत. 

रेल्वेला पावणे दोनशे वर्षांचा इतिहास असल्याने जुने रूळ, पादचारी पूल, वाहनांसाठीचे मोठे पूल आहेत. जुनी यंत्रणा काढून रेल्वेकडून नवीन यंत्रणा उभी केली जात आहे. त्यामुळे रेल्वेकडे मोठय़ा प्रमाणात भंगार निघत आहे.

आर्थिक वर्ष 2022-23 दरम्यान, मध्य रेल्वेने भंगार विक्रीतून 483.29 कोटी महसूल मिळविला. एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत मध्य रेल्वेने केलेली ही आतापर्यतची सर्वाधिक भंगार विक्री असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. हा भंगार महसूल 2022-23 पर्यंतच्या 388.80 कोटींच्या आनुपातिक विक्री उद्दिष्टापेक्षा 36.14 टक्के जास्त आहे. 

भंगाराची विल्हेवाट लावल्याने केवळ महसूल मिळवण्यातच मदत झाली नाही तर परिसर स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासही मदत झाली आहे. मध्य रेल्वे आपल्या कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी चिन्हांकित केलेल्या सर्व भंगार साहित्याची विक्री करण्यासाठी मिशन मोडमध्ये आपले काम करत असल्याची माहीती आहे.