‘नोंदणी व मुद्रांक शुल्क’मध्ये होणार ३५० पदांची भरती
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात भरती प्रक्रिया राबविण्यासाठी बिंदूनामावली निश्चित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांपासून दुय्यम निबंधकांपर्यंतची सुमारे ३५० पदांची भरती केली जाणार आहे.
नोंदणी व मुद्रांक निरीक्षक विभागाच्या राज्यातील सर्व जिल्ह्यांतील कार्यालयांमध्ये लिपिकापासून ते दुय्यम निबंधकांपर्यंत अनेक पदे गेल्या काही वर्षांपासून रिक्त आहेत. या पदांमुळे लिपिकांकडे दुय्यम निबंधकांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात येत आहे. त्यामुळे प्रभारी कार्यभार घेतलेल्या लिपिकांसह अधिकाऱ्यांनी दस्तनोंदणी करताना नियमांचे पालन न केल्याचे अनेक प्रकार गेल्या दोन-तीन वर्षांपासून सातत्याने निदर्शनास येत आहेत. त्यातून बेकायदा पद्धतीने दस्तनोंदणी झाल्याची प्रकरणे उघडकीस येऊन संबंधितांवर कारवाईदेखील करण्यात आली आहे. काही पदांवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार आहे. त्यामुळे या पदांवरील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त होणार आहेत. काही अधिकारी निवृत्त होत आहेत. परिणामी, ती पदे रिक्त राहू नयेत, याकरिता ही भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गेल्या वर्षी ७८, तर यंदा ४९ जागांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे. तसेच उर्वरित वर्ग तीन आणि चार ही पदेही भरण्यात येणार आहेत. त्याकरिता बिंदूनामावली निश्चित झाल्यानंतर नेमकेपणाने किती जागा भरण्याची गरज आहे, हे लक्षात येणार असल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.