Take a fresh look at your lifestyle.

नौदलात पहिल्यांदाच भरती होणार महिला खलाशी!

0

सुरक्षादलातील महिला भारतीय नौदलात लिंग समानता आणण्याच्या उद्देशाने भारतीय नौदलाने अलीकडेच नव्याने सुरु करण्यात आलेल्या अग्निपथ भरती योजनेद्वारे महिला खलाशांची भरती सुरू करण्याची आपली योजना जाहीर केली होती. भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती याआधीच करण्यात आलेली आहे. पण असे पहिल्यांदाच घडेल की अधिकारी दर्जापेक्षा कनिष्ठ असणाऱ्या पदांसाठी महिलांची भरती करण्यात येईल.

रविवारी संरक्षण मंत्रालयात त्रि-सेवा पत्रकार परिषदेमध्ये बोलताना वाइस एडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी सांगितले की अग्निपथ उपक्रमाद्वारे नेमलेल्या महिला खलाशांची नेमकी संख्या अद्याप निश्चित केली जात आहे. अग्निवीरांची पहिली तुकडी या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये प्रशिक्षणाला सुरुवात करेल, असेही त्यांनी नमूद केले.

भारतीय नौदलाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “सध्या भारतीय नौदलाच्या विविध जहाजांवर 30 महिला अधिकारी कार्यरत आहेत. अग्निपथ योजनेच्या माध्यमातून महिलांचीही भरती केली जाईल आणि त्यांना युद्धनौकांवर काम करण्याची संधी दिली जाईल.” भारतीय नौदलातील खलाशांसाठी प्राथमिक प्रशिक्षण देण्याचे काम जिथे केले जाते त्या ओडिशातील INS चिल्का या युद्धनौकेवर महिला खलाशांची राहायची व्यवस्था सध्या केली जात आहे.

त्रिपाठी म्हणाले की, “या वर्षाच्या 21 नोव्हेंबरपासून अग्निवीर म्हणून भरती केल्या गेलेल्या नौदल कर्मचार्‍यांचा पहिला गट ओडिशातील INS चिल्का प्रशिक्षण केंद्रात दाखल होणार आहे. या प्रशिक्षणात महिला आणि पुरुष दोन्ही अग्निविरांना सहभागी होण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.”

भारतीय सुरक्षा दलांच्या तिन्ही प्रमुखांच्या उपस्थितीत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी 14 जूनला अग्निपथ या योजनेची घोषणा केलेली होती. ही योजना एक अतिशय महत्वकांक्षी योजना असल्याचे त्यांनी म्हटले होते. ही योजना 17 ते 21 वर्षे वयोगटातील तरुण व्यक्तींना चार वर्षांच्या कालावधीसाठी सशस्त्र सेवांमध्ये भरती करण्यास परवानगी देते, त्यातील 25% उमेदवारांना 15 वर्षांपर्यंत सेवाबढती मिळण्याची शक्यता असते. केंद्राने गेल्या वर्षी भरतीसाठी उच्च वयोमर्यादा 23 वर्षे केली होती.

अग्निपथ योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून या योजनेअंतर्गत भरती झालेल्या उमेदवारांना अग्निवीर म्हणून संबोधण्यात येणार होते. सरकारच्या घोषणेमध्ये असे म्हटले आहे की, भविष्यात उद्भवू शकणार्‍या आव्हानांचा सामना करण्यासाठी सशस्त्र दलांना तरुण, तंदुरुस्त आणि अधिक वैविध्यपूर्ण बनवण्यासाठी यावर्षी 46,000 अग्निवीरांची भरती केली जाईल. अग्निपथ कार्यक्रमाविरोधात काही राज्यांमध्ये निदर्शने झाली असली तरी सरकारने चिंता दूर करण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत.