राज्य उत्पादन शुल्क विभागातील 667 पदे लवकरच भरणार
विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात खारघर आणि नवी मुंबई येथील अवैध दारू वाहतुकीबाबत तारांकित प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना देसाई यांनी विभागातील कर्मचारी भरतीची माहिती दिली.

तसेच राज्यातील अवैध दारूचा शोध घेण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क आता खबऱ्यांची मदत घेणार आहे. एखाद्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलिस ज्याप्रमाणे खबऱ्यांची मदत घेतात, त्याच धर्तीवर अवैध दारू शोधण्यासाठी खबऱ्यांचे जाळे तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्य उत्पादन शुल्क विभागात प्रथमच इतकी मोठी पदभरती केली जात आहे. टीसीएस या कंपनीमार्फत ही पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. याशिवाय या विभागासाठी २९० पदांच्या भरतीची मागणी करण्यात आली असून यापैकी ११४ पदांची मागणी मंजूर करण्यात आली आहे.
उर्वरित १७६ पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जाणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी गुन्हे नोंदवण्याच्या संख्येत ७.६ टक्क्यांवर वाढ झाली आहे.
याशिवाय आरोपी पकडण्याचे प्रमाण ३१. २६ टक्के आहे, तर मुद्देमाल जप्त करण्याचे प्रमाण २१.१६ टक्के आहे. राज्यात सध्या ५७ भरारी पथके कार्यरत आहेत, तर १२ तपासणी नाके असून येत्या काळात तपासणी नाके वाढवण्याचे प्रस्तावित असल्याचे देसाई यांनी सांगितले.