आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी 25 मार्चपर्यंत मुदतवाढ
आर्थिक दूर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी इंग्रजी शाळांमध्ये राखीव २५ टक्के जागांवर प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यास शुक्रवारी शिक्षण विभागाने मुतदवाढ दिली आता पालकांना २५ मार्च पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. दरम्यान, १७ मार्च पर्यंत बीड जिल्ह्यात विक्रमी ६ हजार ३१० अर्ज दाखल झाले होते. मुदतवाढीनंतर ही संख्या वाढणार आहे.
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी इंग्रजी शाळांमध्ये त्यांच्यासाठी २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात यासाठी पालकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो व त्यानंतर राज्य स्तरावरुन सोडत काढून विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड केली जाते. यंदाही बीड जिल्ह्यात २२५ शाळांमधून १ हजार ८२७ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.

यासाठी अर्ज करण्याचा शुक्रवार हा शेवटचा दिवस होता. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६ हजार ३१० अर्ज दाखल झाले होते. दरम्यान, अर्ज करण्यासाठीचे संकेतस्थळ धिम्या गतीने चालत होते व तांत्रिक अडचणी असल्याने अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी पालकांमधून होत होती. अखेर, शिक्षण विभागाने या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे.