शासकीय कर्मचारी बदली बाबत शासन निर्णय जारी….
शासकीय कर्मचाऱ्यांच्या विनंतीवरुन संवर्गाअंतर्गत एका नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवरुन दुसऱ्या नियुक्ती प्राधिकाऱ्याच्या आस्थापनेवर कायमस्वरुपी समावेशन करण्याबाबतचे धोरण संदर्भाधीन शासन निर्णयाव्दारे विहित करण्यात आले आहे.

या धोरणांतर्गत अनुक्रमांक ६ येथे कायमस्वरुपी समावेशनाचे धोरण कोणत्या बाबींसाठी अनुज्ञेय राहणार नाही, याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. सदर बाबींपैकी ६(१) (अ) द्वारे असे विहित करण्यात आले आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील गट-क च्या पदावरुन आयोगाच्या कक्षेबाहेरील गट-क च्या पदावर तसेच आयोगाच्या कक्षेबाहेरील गट-क च्या पदांवरुन आयोगाच्या कक्षेतील गट-क च्या पदावर कायमस्वरुपी समावेशन करता येणार नाही. यासंदर्भात मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई यांनी मूळ अर्ज क्र.७३/२०२० च्या अनुषंगाने पारीत केलेल्या न्यायनिर्णयाबाबत साधकबाधक विचार करुन सुधारित सूचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय:- वरील पार्श्वभूमीवर संदर्भाधीन दि.१५.०५.२०१९ च्या शासन निर्णयातील अनुक्रमांक ६(१) (अ) वगळण्यात येत असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील गट-क च्या पदांवरुन आयोगाच्या कक्षेबाहेरील गट-क च्या पदावर तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट-क च्या पदांवरुन आयोगाच्या कक्षेतील गट-क च्या पदावर कायमस्वरुपी समावेशन, संदर्भाधीन शासन निर्णयात विहित केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून अनुज्ञेय असेल.
परंतु, असे कायमस्वरुपी समावेशन करताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी विचार विनिमय करणे आवश्यक राहील. सदर शासन निर्णय विधि व न्याय विभागाने त्यांच्या अनौ. संदर्भ क्र.२६३ सिव्हील / २०२२/अ शाखा, दि. ०६/१०/२०२२ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात आला आहे.
शासन निर्णय क्रमांक: एसआरव्ही २०२२/प्र.क्र.४२ / कार्यासन १२ सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर
उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२२१२२८१६३३१७७३०७ असा आहे.