Take a fresh look at your lifestyle.

बी.एस्सी, बी.कॉमचे शिक्षण मराठीतून घेता येणार, यूजीसीचा मोठा निर्णय…

0

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 मधील तरतुदी लागू करण्यासाठी मोदी सरकारकडून वेगाने पावले उचलली जात आहेत. या तरतुदीनुसार, विद्यार्थ्यांना आता उच्च शिक्षणही मातृभाषेतून घेता येणार आहे. त्यासाठी मातृभाषेत पाठ्यपुस्तके तयार केली जात असून, त्यामुळे उच्च शिक्षण घेतानाही विद्यार्थ्यांना भाषेचा अडसर येणार नाही.

12 भारतीय भाषांमध्ये पुस्तके:- विद्यापीठ अनुदान आयोग, म्हणजेच यूजीसीने नुकतेच यासंदर्भात एक नोटिफिकेशन जारी केले आहे. त्यानुसार, बीए, बी.एस्सी. व बी.कॉमच्या इंग्रजी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकांच्या आवृत्त्या आता 12 भारतीय भाषांमध्ये प्रकाशित केल्या जाणार आहेत. त्यात आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू व उर्दू या भाषांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेतून बीए, बी.एस्सी. व बी.कॉमचे शिक्षण घेता यावे, यासाठी ‘यूजीसी’ने देशातील आघाडीच्या पुस्तक प्रकाशकांसोबत नुकतीच एक बैठक घेतली. त्यात 12 मातृभाषांमध्ये पुस्तके प्रकाशित करण्यावर चर्चा झाल्याची माहिती युजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी दिली.

देशभरातील केंद्रीय व राज्य विद्यापीठे, संलग्न महाविद्यालये, इतर उच्च शिक्षण संस्थांमध्ये चालवल्या जाणार्‍या विविध पदवी स्तरावरील अभ्यासक्रमांसाठी मातृभाषेतून शिक्षणाची सोय केली जाणार आहे. बैठकीत सहभागी प्रकाशकांनी या राष्ट्रीय मिशनमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुकता दाखवल्याबद्दल आम्ही त्यांचे कौतुक करीत असल्याचेही ते म्हणाले.

इंग्रजी माध्यमातील पुस्तके, तसेच सध्या प्रचलित पुस्तकांच्या अनुवादित आवृत्त्या 12 भारतीय भाषांमध्ये प्रकाशित केल्या जातील. या कामात विद्यापीठ अनुदान आयोग एक नोडल एजन्सी म्हणून काम करील. यूजीसीकडून प्रकाशकांना पाठ्यपुस्तके ओळखण्यात आणि विषय तज्ञांसह त्यांचे संपादन करण्यासाठी सहकार्य केले जाणार आहे.