CDCC बँकेतील नोकर भरतीवरील स्थगिती हटली
जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, नोकरदार व सामान्य नागरिकांची बँक CDCC बँक असलेली चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकर भरतीवर असलेली स्थगिती 23 ऑक्टोबर 2022 च्या पत्रानुसार राज्य शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत हटविण्यात आली आहे.

परिणामी जिल्ह्यातील बेरोजगारांना सुवर्णसंधी प्राप्त झाली असून, बेरोजगारांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांनी दिली आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याने त्याचा विपरित परिणाम बँकेच्या दैनंदिन कामकाजावर होत आहे. त्यामुळे नोकर भरतीकरिता बँकेतर्फे राज्य शासनाच्या सहकार विभागाकडे रितसर परवानगी मागण्यात आलेली होती.
17 फेब्रुवारी 2022 च्या सहकार आयुक्तांच्या पत्रानुसार बँकेला 360 पदे सरळ सेवेव्दारे भरण्याची मंजुरी प्राप्त झाली होती. मात्र, भरती प्रक्रिया सुरु असतानाच 12 मे 2022 ला याच विभागातर्फे सरळ सेवेने भरावयाच्या पदास स्थगिती देण्यात आली होती.
चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालयातील 6 विभाग, 4 विभागीय कार्यालय व 82 शाखांसह 11 पे ऑफीस, असे एकुण 93 शाखा कार्यरत आहेत. बँकेला एकूण 885 पदे मंजूर असून, आजस्थितीत बँकेत विविध श्रेणीत 501 कर्मचारी कार्यरत आहे. आजच्या स्थितीत 384 पदे रिक्त आहेत व 31 मार्च 2023 पर्यंत 13 पदावरील अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत.
सद्यस्थितीत बँकेच्या 93 शाखांमार्फत 501 कर्मचारी घेऊन बँकेचे कामकाज चालविणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. अशा परिस्थीतीत कर्मचारी भरती न झाल्यास बँकेचे कामकाज बंद पडून ग्राहक सेवेत अडचण निर्माण होऊन शाखा बंद पडण्याची शक्यता आहे, असेही रावत यांनी सांगितले आहे.
अकारण राजकारण करुन बँकेला वेठीस धरल्या गेले. मात्र, राज्य शासनाने भरतीबाबत लोकहितार्थ निर्णय घेतला. राज्य शासनाच्या निर्देशांचे पालन करून सर्व भरती प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने राबवू, अशी प्रतिक्रिया रावत यांनी व्यक्त केली आहे.