‘पासपोर्ट’ बनवणं झालं सोप्पं, ‘या’ दाखल्यासाठी होणारी धावपळ थांबणार
जगभर फिरायचं म्हणजे पासपोर्ट हवाच. मात्र, पासपोर्ट बनवताना अनेक जण मेटाकुटीला येतात. कारण, ही एक वेळखाऊ प्रक्रिया असते. पासपोर्ट तयार करताना, वेगवेगळ्या प्रक्रियांमधून जावं लागत. त्यात महत्वाचं असतं, पोलिस व्हेरिफिकेशन ‘पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट’ असल्याशिवाय ‘पासपोर्ट’ दिला जात नाही.
पासपोर्ट काढताना ‘पीसीसी’ ही एक महत्वाची प्रक्रिया आहे. निवासी स्थिती, रोजगार किंवा दीर्घकालीन व्हिसा, इमिग्रेशनसाठी अर्ज करताना ‘पोलिस व्हेरिफिकेशन’ आवश्यक असतं. पासपोर्ट बनवू इच्छिणाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचा मोठा निर्णय:- पासपोर्टसाठी अनिवार्य असलेल्या ‘पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट’साठी (Police Clearance Certificate) अर्जदारांना आता सर्व ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांमध्ये अर्ज करता येणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of External Affairs) जाहीर केलं आहे. या निर्णयाचा फायदा परदेशात नोकरी शोधणाऱ्या भारतीयांसह इतरांनाही होणार आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी केले आहे. ‘पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट’साठी अर्जदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने या समस्येचे निराकरण करण्यासाठी, मंत्रालयाने भारतातील सर्व ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांना ‘पीसीसी’साठी अर्ज करण्याच्या सुविधेसह जोडण्याचा निर्णय घेतला आहे. पासपोर्ट अर्जदार आता ‘पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट’साठी (PCC) सर्व पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रावर (POPSK) ऑनलाइन अर्ज करू शकतात. ही ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा 28 सप्टेंबरपासून (बुधवार) सुरू होणार आहे. त्यासाठी आगाऊ अपॉइंटमेंटही घेता येणार आहे.